उरणमध्ये भात कापणी अंतिम टप्प्यात; रानडुक्करांमुळे शेतीचे नुकसान,शेतकरी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 05:34 PM2023-11-10T17:34:44+5:302023-11-10T17:35:42+5:30

राज्यात सर्वत्र शेतीच्या कामांना वेग आला आहे.परंतु मजुरांअभावी शेतकरी चिंतेत सापडला आहे.

harvest in final stage farm damage due to wild boars in Uran | उरणमध्ये भात कापणी अंतिम टप्प्यात; रानडुक्करांमुळे शेतीचे नुकसान,शेतकरी चिंतेत

उरणमध्ये भात कापणी अंतिम टप्प्यात; रानडुक्करांमुळे शेतीचे नुकसान,शेतकरी चिंतेत

उरण : उरण तालुक्यात भात कापणीला  जोरदार सुरुवात झाली असून भात कापणी अंतिम टप्प्यात  आली आहे. मात्र तरीही अजून सर्वत्र शेतमजुरांची टंचाई भासत असल्याने  शेतकरी  चिंतातूर झाला आहे.

निसर्गचक्राचे बिघडलेले संतुलन आणि अवकाळी पडणारा पाऊस ही भीती शेतकऱ्यांच्या मनात आहेच. अशातच हातातोंडाशी आलेला घास हिरावूनजाऊ नये म्हणून शेतकऱ्यांची भात कापणीची धावपळ सुरू आहे. परंतु भात कापणीकरीता वेळीच मजूर मिळत नसल्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.दरम्यान नाईलाजाने शेतकरी, आपल्याच कुटुंबातील नातेवाईकांच्या मदतीने शेतात भात कापणी करताना दिसत आहेत. उरण तालुक्यात चिरनेर विभागात अनेक ठिकाणी आदिवासी मजुरांचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

एकेकाळी भात कापणी झाल्यानंतर पिकाची कडवे चार दिवस चांगली वाळल्यानंतरच त्याचे भारे बांधून उडव्यात  रचून ठेवले जात असत. त्यानंतर शेतातच खळा  तयार करून त्याचे व्यवस्थित शेणाने सारवण करून त्यानंतरच त्या खळ्यावर मळणीची प्रक्रिया केली जात होती.


 परंतु सध्याच्या लहरी पावसाच्या भीतीने वर्षभर केलेले  कष्ट व त्यासाठी केलेला अमाप खर्च वाया जाऊ नये म्हणून शेतकरी पिके न वाळवताच आणि त्याची साठवणूक न करताच ताबडतोब कापलेले भात पीक  झोडून भात घरी आणत आहेत. उरण तालुका भाताचे कोठार समजले जात होते. परंतु मागील काही वर्षापासून शेती व शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या माध्यमातून नुकसान होत असल्याने, तसेच येथील औद्योगीकरणामुळे शेतीतील उत्पादनावर हमखास गदा येताना दिसत आहे. पूर्वी इतके भाताचे शेतीतून विक्रमी उत्पादन होत नाही .

भातशेती ही पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना कधी ओला दुष्काळ तर कधी सुक्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी जमिनी लागवडी खाली न आणता त्या ओसाड ठेवल्या जात आहेत. त्यामुळे या भागात शेतीकडे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. ज्या मूठभर शेतकऱ्यांनी भातशेतीची लागवड केली आहे. अशाही शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी मजूर उपलब्ध होत नसल्यामुळे येथील शेतकरी हवालदिल  झाला आहे. त्यातच जंगल भागात असणाऱ्या भात शेतीवर रानडुकरांची वक्रदृष्टी वळली असल्याने, भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास कळपाने पिकावर हल्ला करणारी रानडुकरे हिरावून नेत असल्याने, रानडुकरांचा वनविभागाकडून, बंदोबस्त करावा अशी मागणीही उरण परिसरातील शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

Web Title: harvest in final stage farm damage due to wild boars in Uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.