जवान, डॉक्टर यांच्याप्रती सकारात्मक दृष्टिकोन हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 01:58 AM2019-06-11T01:58:41+5:302019-06-11T01:59:05+5:30
भिकू पेडामकर : महाड तालुक्यातील ढालकाठी-बिरवाडी येथील निवृत्त आॅनररी कॅप्टनचा आयएमएकडून गौरव
अलिबाग : देशाच्या रक्षणार्थ भारतीय सेना दलात कार्यरत जवान आणि अधिकारी तर समाजात आरोग्य रक्षणार्थ कार्यरत डॉक्टर्स यांच्याबाबत समाजाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. त्यातून या दोन्ही घटकांचे मनोबल उंचावून त्यांच्याकडून देश आणि मानव संरक्षणाचे कार्य अधिक प्रभावीपणे होईल, असे प्रतिपादन ‘जवान ते आॅनररी कॅप्टन’ अशी तब्बल २८ वर्षांची लष्करी सेवा पूर्ण केलेले महाड तालुक्यातील ढालकाठी-बिरवाडी येथील निवृत्त आॅनररी कॅप्टन भिकू पेडामकर यांनी केले आहे.
भारतीय लष्करात अनन्यसाधारण गौरव परंपरा निर्माण केलेल्या मराठा रेजिमेंटला यंदा तब्बल २५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून याच मराठा रेजिमेंटमध्ये देशरक्षणार्थ धाडसी कामगिरी बजावणारे निवृत्त आॅनररी कॅप्टन भिकू पेडामकर यांचा विशेष गौरव करण्यात आला. रविवारी येथील पीएनपी नाट्यगृहात आयोजित एका विशेष समारंभात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) अलिबाग शाखेच्या वतीने ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ निवृत्त मेजर डॉ.अरविंद पाटणकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी आयएमए अलिबागचे अध्यक्ष बालरोग तज्ज्ञ डॉ.राजेंद्र चांदोरकर, सचिव भूलतज्ज्ञ डॉ.संजीव शेटकार, खजिनदार अस्थीरोग तज्ज्ञ डॉ.सतीश वेश्वीकर आदि मान्यवरांसह शहरातील सर्व डॉक्टर्स व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
निवृत्त आॅनररी कॅप्टन भिकू पेडामकर आपले लष्करी सेवेतील अनुभव सांगताना पुढे म्हणाले, वयाच्या १७ व्या वर्षी, इयत्ता सातवीत असताना, केवळ देशरक्षणाच्या ध्यासाने, १९७१ मध्ये भारतीय लष्कराच्या भरतीत ‘जवान’ म्हणून दाखल झालो. बेळगाव येथे सहा महिने सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केल्यावर भारतीय लष्कराच्या अनन्यसाधारण शौर्य परंपरेच्या, ‘मराठा रेजिमेंट’मध्ये नियुक्ती झाली. आणि तत्काळ १९७१ मध्ये भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर बंगालमधील न्यूमाल जंग्शन येथे रवाना झालो. तो प्रसंग आयुष्यात कधीही विसरणे शक्य नाही.
सेवाकाळातील सुवर्ण स्मृतीक्षण म्हणजे, सेना प्रमुख टी.एन.करिअप्पा, जनरल विजय ओबेरॉय, आणि अलिबागचे सुपुत्र जनरल अरु णकुमार वैद्य यांच्या संरक्षण पथकात सेवा बजावली तर मिसाईलमॅन राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम, राष्ट्रपती आर.व्यंकटनारायण, राष्ट्रपती बी. डी. जत्ती यांच्या व्यक्तिगत सुरक्षा पथकात सेवा बजावल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.राजेंद्र चांदोरकर यांनी केले. सत्कार सोहळ््यानंतर डॉक्टरांनीच बसवलेल्या विविध एकांकिकांचे शानदार प्रस्तुतीकरण यावेळी करण्यात आले.
लष्करी सेवेतच सरकारी नियमानुसार पुढील शिक्षण पूर्ण : लष्करी सेवेत असतानाच सरकारी नियमानुसार सेनेतच पुढील शिक्षण पूर्ण केले. भारतीय लष्करी अभ्यासक्र मातील मॅपरिडिंगमधील ‘एम.आर.फर्स्ट’, ‘आय.ए.फर्स्ट’ आणि ‘इंग्रजी-सेकंड ’ हा अभ्यासक्र म गुणवत्तेसह पूर्ण केला. हे शिक्षण आणि लष्करातील कामगिरी याची भारतीय लष्कराने विशेष दखल घेवून १५ आॅगस्ट १९९८ ‘आॅनररी लेफ्टनंट’ पद प्रदान करून सन्मानीय नियुक्ती देण्यात आली. तर जानेवारी १९९९ मध्ये भारतीय लष्कराने पुन्हा एकदा विशेष दखल घेवून त्यांना ‘आॅनररी कॅप्टन’ पद प्रदान करु न मोठा गौरव केल्याचे त्यांनी सांगितले.
भूसुरु ंगांच्या स्फोटात २० जण शहीद
१४ दिवसांच्या या युद्धात केलेल्या सक्रि य आणि धाडसी कामगिरीची नोंद घेवून बर्फाच्छादित सिक्कीम सीमा प्रांतात दोन वर्षाकरिता नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर केवळ देशासाठी आपण अशीच भावना होती, असे त्यांनी सांगितले. राजस्थानात भारत-पाक सीमा, मणिपूर, नागालँड आणि मिझोराम, जम्मू-काश्मीर सीमेवरील भारतीय लष्करी केंद्र, डेहराडून लष्करी तळ, श्रीलंका शांतीसेना अशी सेवा बजावीत असताना श्रीलंकेत जमिनीत पुरून ठेवलेल्या भूसुरु ंगांच्या शक्तिशाली स्फोटात शांतीसेनेतील रोज सोबत असणारे तब्बल २० सहकारी भारतीय जवान डोळ्यादेखत शहीद झाले, तो प्रसंग आणि ती परिस्थिती आजही डोळ््यासमोरून हटत नसल्याचे त्यांनी सांगितले.