पनवेल : एमआयडीसी क्षेत्रात उद्योग मित्र कार्यालय उभारावे, तरच नवे उद्योजक घडतील, अशी मागणी फोरम आॅफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अभय भोर यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली.महाराष्ट्रात छोटी-मोठी अंदाजे २९५ एमआयडीसी कार्यक्षेत्रे आहेत. या भागातील उद्योजकांना जागेसंदर्भातील शासकीय योजना, विजेसंदर्भात आणि शासकीय परवानग्यांची या केंद्रामार्फत निश्चित मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकेल, परंतु सध्याच्या घडीला जिल्ह्यापुरते उद्योग केंद्र असल्याने, ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना यासाठी शहरी भागात यावे लागते. ते अनेक जणांना शक्य होत नाही. अनेक नव उद्योजक मध्यस्थीमार्फत बँकांमध्ये जातात आणि त्यांना विनाकारण अनाठायी खर्च करावा लागतो. परिणामी, उद्योजक होण्याची अनेक तरुण-तरुणींची स्वप्ने धुळीस मिळत आहेत. सरकारने अनेक योजना जरी उद्योगांसाठी जाहीर केलेल्या असल्या, तरी त्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यासाठी केंद्राची संख्या वाढविणे गरजेचे आहे. उद्योगांना या केंद्रामार्फत व्यवसायास जागा, भांडवल,शासकीय योजना, विजेसंदर्भात माहिती, उद्योगांना लागणाऱ्या शासकीय परवानग्या दिल्या जाव्यात.मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, पनवेल या भागात उद्योगांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्हा उद्योग केंद्राने सध्या आजारी उद्योगांची संख्या जाहीर करावी. या उद्योगांशी संपर्क साधून ते उद्योग पुनर्उभारणी करण्यास प्रयत्न करावयास हवे, अशी मागणीही फोरमचे अध्यक्ष अभय भोर यांनी केली आहे.
एमआयडीसी क्षेत्रात हवेय महाराष्ट्र उद्योग मित्र कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 11:33 PM