घागरकोंड पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 03:59 AM2017-07-20T03:59:24+5:302017-07-20T03:59:24+5:30

तालुका हा पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध होत असताना या पर्यटन स्थळाकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे. वाकण ग्रामपंचायत हद्दीतील

Hazardous Poles Dangerous | घागरकोंड पूल धोकादायक

घागरकोंड पूल धोकादायक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पोलादपूर : तालुका हा पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध होत असताना या पर्यटन स्थळाकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे. वाकण ग्रामपंचायत हद्दीतील सावित्री नदीवरील घागरकोंड झुलता पूल हा पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. हा झुलता पूल नायगरा धबधब्याची आठवण करून देणारा जलप्रपात पहाण्यासाठी हजारो पर्यटक या स्थळाला भेट देत असतात. सध्या हा झुलता पूल धोकादायक बनला असून बऱ्याच ठिकाणी वायररोप तुटला आहे. जॉइंटच्या ठिकाणी गंज लागून तुटण्याच्या अवस्थेत आहे. जर जास्त संख्येने पर्यटक या पुलावर गेले तर हा पूल तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी स्थिती असताना देखील येथे कोणतीही धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आलेले नाहीत.
या ठिकाणी नदीच्या दोन्हीही बाजूला संरक्षक कठड्यांची आवश्यकता आहे. संरक्षक कठडे नसल्याने गेल्या वर्षी एका शाळकरी मुलाचा पाय घसरून पाण्यात पडून मृत्यू झाला. या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसत नाही. याबाबत स्थानिक जिल्हा परिषद सदस्य तथा माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्याशी संपर्क साधला असता आपण गेली दोन वर्षे जिल्हा परिषदेकडे येथे संरक्षक कठडे आणि वायररोप बदलण्याची मागणी करत आहोत. मात्र बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत राजिप बांधकाम उपविभाग महाड कार्यालयाशी संपर्क साधला असता हा झुलता पूल अंदाजे ३५ वर्षांपूर्वी बांधला असल्याची माहिती दिली. १५ वर्षांपूर्वी या पुलाचे वायररोप बदलल्याचे सांगितले. तसेच संरक्षक कठडे आणि वायररोप बदलण्याचे अंदाजपत्रक दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे पाठवल्याची माहिती उपअभियंता शिर्के यांनी दिली. संबंधित खात्याने या झुलत्या पुलाकडे तातडीने लक्ष देवून वायररोप, संरक्षक कठडे लवकर करून सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.

Web Title: Hazardous Poles Dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.