घातक पदार्थांमुळे मिळते दुर्घटनेला निमंत्रण, नागरिक, कामगारांचे जीवन धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 06:27 AM2021-01-31T06:27:30+5:302021-01-31T06:27:54+5:30
उरण परिसरातील द्रोणागिरी नोडमधील पंजाब स्टेट कंटेनर अँड वेअर हाऊसिंग आणि बफरयार्डमध्ये अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात येत असलेल्या घातक पदार्थांच्या साठवणुकीमुळे आगीसारखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- मधुकर ठाकूर
उरण : उरण परिसरातील द्रोणागिरी नोडमधील पंजाब स्टेट कंटेनर अँड वेअर हाऊसिंग आणि बफरयार्डमध्ये अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात येत असलेल्या घातक पदार्थांच्या साठवणुकीमुळे आगीसारखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे परिसरातील गावातील वस्ती, नागरिक आणि कामगारांचे जीवन धोक्यात येऊ लागले आहे. हजारो नागरिक, कामगारांच्या जिवाशी खेळ करू पाहणाऱ्या संबंधित प्रकल्पांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी पागोटे ग्रामपंचायतीने कस्टम आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.
उरण परिसरात द्रोणागिरी नोडमध्ये पंजाब सरकारच्या मालकीचे पंजाब स्टेट कंटेनर ॲण्ड वेअरहाऊसिंग आणि बफरयार्ड हे दोन कंटेनर यार्ड कार्यरत आहेत. या दोन्ही कंटेनर यार्डमध्ये दिलेल्या परवानगी पेक्षाही मोठ्या प्रमाणावर घातक पदार्थ साठवणूक केली जात असल्याचे आढळून आले आहे. बाहेर जाणाऱ्या प्रवेशद्वाराच्या शेजारी असलेले पत्रा शेड, एक्सपोर्ट गल्लीतील पत्रा शेड, तारपोलिन शेड, आदी विविध ठिकाणी अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात घातक पदार्थांची साठवणूक केली जात आहे.
विशेष म्हणजे आगीची दुर्घटना घडली तर या दोन्ही कंटेनर यार्डमध्ये आग विझविण्यासाठी कोणतीच सोय उपलब्ध नाही. याआधीही पंजाब स्टेट कंटेनर अँड वेअरहाऊसिंग प्रकल्पात २०१० साली आगीची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जळून नष्ट झाली होती. याकडे लक्ष वेधून घातक पदार्थ साठवणुकीचा परवाना रद्द करण्याची मागणी पागोटे ग्रामपंचायतीने कस्टम, आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.
घातक पदार्थांच्या साठवणुकीविरोधात करण्यात आलेली तक्रार चुकीची आणि चुकीच्या माहितीच्या आधारावर करण्यात आली आहे. या प्रकल्पात काम करणाऱ्या काही सदस्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय स्वार्थ साधण्यासाठी या तक्रारी करण्यात आल्या.
- जेम्स जोसेफ,
प्रकल्प युनिट हेड