मृत्युनंतर रक्ताच्या नात्यानेही त्यांना नाकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 12:35 AM2021-05-06T00:35:22+5:302021-05-06T00:35:42+5:30
म्हसळ्यातील गोविंद जाधव यांची व्यथा
निखिल म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक, ग्रामस्थ एकत्रित येऊन मृत व्यक्तीची प्रेतयात्रा काढून स्मशानभूमीत अंत्यविधी करतात. त्यानंतर, त्याचे उत्तरकार्य, दशकार्य केले जाते. मात्र, कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेला ना नातेवाईक, ना ग्रामस्थ रुग्णालयातील आरोग्यसेवकच अंत्यविधी करतात. कोरोना रुग्णाचे नातेवाईकही मृत्यूनंतर त्याची अवहेलना करतात. अशीच काहीशी परिस्थिती म्हसळा तालुक्यातील केलटे बौद्धवाडी येथे पाहायला मिळाली.
येथील गोविंद जाधव यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर, गावातील लोक अंत्यसंस्कारासाठी पुढे आले नाहीत, पण त्यांच्या सख्या दोन मुलांनीही वडिलांचे दहन करण्यास नकार दिला. अखेर म्हसळा पोलीस, तहसील कर्मचारी, पत्रकार आणि रुग्णवाहिका चालकाने जाधव यांचा अंत्यविधी केला.कोरोनाच्या भीतीने मुलांसह ग्रामस्थांचा नकार म्हसळा तालुक्यातील केलटे बौद्धवाडी येथील गोविंद कृष्णा जाधव (७६) कोरोनाग्रस्त झाले होते. गोविंद जाधव घरीच कोरोनावर उपचार घेत होते. ३० एप्रिल, २०२१ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाने मृत्यू झाल्याने पुढचा अंत्यविधी करण्यासाठी नातेवाईक, ग्रामस्थांनी नकार दिला. जाधव यांच्या दोन संख्या मुलांनीही वडिलांच्या अंत्यविधीला नकार दिला. त्यामुळे गोविंद जाधव यांचा अंत्यविधी करण्याचा मोठा पेच प्रसंग उभा राहिला. याबाबत म्हसळा पोलिसांना कळताच, पोलीस उपनिरीक्षक उद्धव सुर्वे यांनी पुढाकार घेऊन संतोष चव्हाण, सूर्यकांत यांना त्वरित घटनास्थळी पाठविले. त्याच्यासोबत म्हसळा तहसील कार्यालयाचे सर्कल दत्ता करचे, पत्रकार नीलेश कोकचा आणि रुग्णवाहिका चालक शरद नांदगावकर, भरत चव्हाण हेही आले. शरद नांदगावकर यांनी सर्वांना पीपीई किटची उपलब्धता करून दिली. त्यानंतर, या सर्वांनी तिरडी बांधून जाधव यांची २ किमी स्मशानभूमीपर्यंत खांद्यावर अंत्ययात्रा काढून जाधव यांना अग्नी दिला.
५ माणसांना परवानगी, पण मृतांच्या नशिबी तेही नाही
कोरोनाने मृत पावलेल्या जाधव यांच्या अंत्यविधीला ग्रामस्थांसह स्वतःच्या मुलांनीही नकार दिला. असे असले, तरी पोलीस, महसूल प्रशासन, पत्रकार, रुग्णवाहिका चालक यांनी माणुसकी दाखवून एक सत्कार्य केले. मात्र, अशी वेळ पुन्हा कोणावर येऊ नये, याबाबत प्रशासनाने जनजागृती करणे गरजेचे आहे.
घरातून एक माणूस जाणे हे कधीही सहन होणारे नाही. आज आधारच गेला असल्याने, आम्ही काही वेळ धक्क्यात होतो. काय करायचे काहीच सुचत नव्हते. अशातच गावकऱ्यांनीही हात वर केल्यावर आमची भीती अधिकच वाढली होती.
- मृताचे नातेवाईक
कोरोनामुळे हसत्या-खेळत्या घरातील एका व्यक्तीचा जीव जाणे यापेक्षा दुसरं दु:ख नाही. आज आमच्या कुटुंबावर जी वेळ आली आहे, ती पुन्हा कोणावरही येऊ नये.
- मृताचे नातेवाईक