बहिष्काराच्या प्रथेने काढले डोके वर
By admin | Published: October 8, 2015 12:05 AM2015-10-08T00:05:27+5:302015-10-08T00:05:27+5:30
व्यापक प्रमाणात राबविलेल्या मोहिमेमुळे सामाजिक बहिष्कारांच्या प्रथा बंद झाल्याचे सांगत पाठ थोपटून घेणाऱ्या रायगड जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे.
- आविष्कार देसाई, अलिबाग
व्यापक प्रमाणात राबविलेल्या मोहिमेमुळे सामाजिक बहिष्कारांच्या प्रथा बंद झाल्याचे सांगत पाठ थोपटून घेणाऱ्या रायगड जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. परजातीमध्ये विवाह केल्याने श्रीवर्धन तालुक्यात निगडी येथील गावपंचायतीने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. याप्रकरणी ३१ जणांविरोधात रायगडच्या पोलीस अधीक्षकांमार्फत श्रीवर्धन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सहा महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या व्यापक मोहिमेने वाळीत प्रथा बंद झाल्याचा दावा प्रशासन करीत आहे. मात्र या घटनेने खरे चित्र समोर आले असल्याचे बोलले जाते.
दिलीप बाळाराम जावळेकर आणि अमोल सदानंद जावळेकर हे दोघेही सुतार समाजातील असून ते श्रीवर्धन तालुक्यातील निगडी गावात राहतात. दिलीप यांचा मुलगा राजू जावळेकर याने मराठा समाजातील मुली (रा. कोळे, ता.म्हसळा) बरोबर रजिस्टर मॅरेज केले. त्यांना एक मुलगी आहे. त्याचप्रमाणे अमोल जावळेकर यांनी कुणबी समाजातील मुली (रा. मुहुलवाडी, ता. देवगड, जि.रत्नागिरी) बरोबर रीतसर लग्न केले असून त्यांना एक मुलगा आहे.
गावकीने याचा जाब जावळेकर कुटुंबाला विचारला. त्यांच्या विरोधाला न जुमानल्यामुळे परजातीमध्ये लग्न केल्याने गावकीचे पित्त खवळले. गावकीने प्रथम त्यांची गावकीसाठी घेण्यात येणारी वर्गणी बंद केली. पूजेसाठी लागणारी गावकीच्या मालकीची भांडीही दिली नाहीत आणि पूजेलाही आले नसल्याचे दिलीप आणि अमोल जावळेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. काकीच्या भरणी श्राध्दाच्या विधीतून गावकीने हाकलून लावल्याचेही तक्रार अर्जात नमूद आहे. राजमार्गावर कुंपण घालून येण्या-जाण्याची वहिवाटही बंद करण्यात आली होती. त्यानंतर कायदेशीर मार्गाने तो मार्ग मोकळा करुन घेतल्याचे दिलीप जावळेकरांचे म्हणणे आहे. लग्न कार्यासाठी भांडी न देणे, लग्नाला न येणे अशा प्रकारे समाजातून एक प्रकारे बहिष्कृत करीत मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.
सामाजिक बहिष्काराच्या प्रथेमुळे गावकीचे पंच भारतीय संविधानाला विरोध करीत समांतर न्याय व्यवस्था निर्माण करीत असून ती सर्वच समाजातील नागरिकांना आणि पर्यायाने लोकशाहीला घातक आहे. सामाजिक बहिष्काराची कीड वेळीच रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने पावले टाकणे गरजेचे आहे. सामाजिक बहिष्कारचे बिल लवकरच पारित झाले, तर अशा घटनांना निश्चितच आळा बसण्यास मदत होणार आहे.
पोलीस अधीक्षकांचे जनसंपर्क अधिकारी पोलीस निरीक्षक अरविंद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते कामानिमित्त मुंबईमध्ये होते.
मोलमजुरी करणारे कुटुंब अडचणीत
१जावळेकर कुटुंबाला मदत करणारे सुनिता जावळेकर, सुजाता पानवलकर, रजनी कातळकर, नम्रता पालवणकर आणि शालिनी जोगळेकर यांचीही वर्गणी घेण्याचे बंद केले असून त्यांनाही वाळीत टाकल्याचा दावा जावळेकर कुटुंबाने तक्रारीत केला आहे. ५० हजार रुपयांचा दंड भरा आणि समाजात परत या, असे गावकीकडून धमकावले जात आहे. ५० हजार रुपये दंड भरता येत नसल्याने १५ हजार रुपयांच्या दंडाची मागणी करीत असल्याचेही जावळेकर म्हणाले.
३सामाजिक बहिष्काराच्या प्रथेमुळे गावकीचे पंच भारतीय संविधानाला विरोध करीत समांतर न्याय व्यवस्था निर्माण करीत असून ती सर्वच समाजातील नागरिकांना आणि पर्यायाने लोकशाहीला घातक आहे. सामाजिक बहिष्काराची कीड वेळीच रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने पावले टाकणे गरजेचे आहे. सामाजिक बहिष्कारचे बिल लवकरच पारित झाले, तर अशा घटनांना निश्चितच आळा बसण्यास मदत होणार आहे.
दिलीप बाळाराम जावळेकर आणि अमोल सदानंद जावळेकर हे दोघेही सुतार समाजातील असून ते निगडी गावात राहतात. दिलीप यांचा मुलगा राजू जावळेकर याने मराठा समाजातील मुली बरोबर रजिस्टर मॅरेज केले आहे.