विजय मांडे कर्जत : कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या जांबरुंग ग्रामपंचायमधील ठोंबरवाडी या आदिवासीवाडीमधील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येत असे. मात्र, येथे चार महिन्यांपूर्वी सूत्रे हाती घेतलेल्या नाममात्र शिक्षण घेतलेल्या सरपंचाने वेगळीच शक्कल लढवून त्या आदिवासीवाडीमध्ये नळाद्वारे पाणी पुरवून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविला. तेही भविष्यात विजेचा किंवा कोणताही खर्च नसलेली योजना साकारली गेली. जे निष्णात अभियंत्यांना जमले नाही ते या सरपंचाने करून दाखविल्याने सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.ठोंबरवाडी या आदिवासीवाडीची २५० लोकवस्ती आहे. त्यांच्याकरिता पाच वर्षांपूर्वी पाणी योजना तयार करण्यात आली होती, ती काही कारणाने बंद पडली. कालांतराने ती नादुरुस्त झाल्याने तेथे लांबवर उंचावर भारत निर्माण योजनेतून एक विहीर बांधण्यात आली होती. महिलांना त्या विहिरीवरून पाणी आणावे लागत असे. तर आजूबाजूला असलेल्या मुंबईकरांच्या फार्महाउसमधून मनधरणी करून पाणी आणावे लागे. पाण्यासाठी महिलांची पायपीट होत असे. कधी कधी पाणी देण्यास नकार दिल्याने पाण्यावाचूनही राहावे लागत असे.गेल्या सप्टेंबर महिन्यात थेट सरपंचपदी दत्तात्रेय पिंपरकर निवडून आले. त्यांच्याकडे ठोंबरवाडीतील आदिवासींनी पाण्यासाठी काहीतरी करा, असे साकडे घातले. पिंपरकर यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून या वाडीला पाणी कसे मिळेल? यासाठी काही करता येईल काय? या दृष्टीने विचार केला आणि त्यांना एक कल्पना सुचली. यासाठी भारत निर्माण योजनेतून बांधलेल्या उंचावर असलेल्या विहिरीचा उपयोग करण्याचे त्यांनी ठरविले. लहानपणी किल्ले करताना किंवा खेळताना उंचावर पाण्याचे भांडे ठेवून तोंडाने पाणी ओढून कारंज्या साकारण्याची साधी कल्पना त्यांनी अमलात आणण्याचे ठरविले, ती म्हणजे ‘सायपान पद्धत’ आणि ते कामाला लागले. ७५० मीटर लांबीचा एक इंची रबरी पाइप त्यांनी आणला. तो पाइप सुरुवातीला विहिरीपासून गावापर्यंत नेला. त्यानंतर तो विहिरीत टाकला व पाणी काढण्याचा प्रयत्न केला;’ परंतु पाइपमध्ये हवा असल्याने पाणी येईना. नंतर त्यांनी आपल्या विहिरीतील पंप काढून या विहिरीवर आणला व सुमारे २५० मीटरवर असलेल्या फामहाउस जवळून विजेचे कनेक्शन आणून पाइप पाण्याने भरला, त्यामुळे पाइपामधील हवा निघाली आणि पाणी वाडीपर्यंत आले. त्यांनतर त्यांनी पंप काढून टाकला व उतार असल्याने मोट्या दाबाने पाणी सुरू झाले.गावापर्यंत आलेले पाणी पाइपला बुच लावून बंद केले व नादुरुस्त असलेल्या पाणी योजनेच्या जुन्या पाइपलाइनला जोडले. जुन्या योजनेच्या स्टॅण्ड पोस्टची डागडुजी केली व पाणी सुरू केले. गावात एकूण सहा ठिकाणी ११ नळांद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न केला; परंतु गाव उतारावर असल्याने सुरुवातीच्या दोन नळांना पाणी येत नव्हते. काय करावे ते सुचेना, मग त्यांनी गूगलच्या साहाय्याने जमिनीची पातळी तपासली व सुरुवातीच्या नळांची उंची कमी केली. त्यानंतर सर्वच नळांना धो धो पाणी सुरू झाले. आदिवासींचा आनंद गगनात मावेनासा झाला.>योजनेचे सर्वत्र कौतुक; अनेकांची प्रकल्पास भेटआदिवासी महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरल्याचे समाधान मात्र सरपंच दत्तात्रेय पिंपरकर यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते. तेसुद्धा केवळ सुमारे एक लाख रुपये खर्च करून. भविष्यात विजेचा अथवा कोणताही खर्च नाही, अशी योजना सुरू झाली.एखाद्या निष्णात अभियंत्यालाही लाजवेल, अशी कामगिरी जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या एका सरपंचाने करून दाखविली याचे कौतुक सर्वत्र होत असून, त्यांनी काय शक्कल लढवली ते पाहण्यासाठी काही जण या योजनेला भेट देत आहेत.>पाणी आणण्यासाठी आम्ही मुंबईकर फार्महाउसवाल्यांकडे जात होतो, कधी कधी पाणी मिळत नसे, तेव्हा आमच्या डोळ्यात पाणी येत असे; परंतु सरपंचांनी गावात पाणी आणून आमच्या डोक्यावरील हंडा उतरवला व अश्रूही पुसले.- पूजा मोरे, महिला ग्रामस्थ, ठोंबरवाडी>पाण्यासाठी आम्हाला वणवण करावी लागत असे, सरपंचांनी लक्ष घातल्याने आम्हाला घराजवळ पाणी मिळू लागले आहे.- मंदा ठोंबरे, महिला ग्रामस्थ, ठोंबरवाडीआमच्या महिलांना पाणी भरण्यासाठी दिवसभर पायपीट करावी लागे; परंतु सरपंचांनी पदभार घेतल्यावर पहिले आमचे पाण्याचे काम केले.- सुरेश बांगारे, ग्रामस्थ>आदिवासींचे हातावर पोट असते. दिवसभर पाणी भरण्यात गेला तर घर कसे चालणार म्हणून मी ही साधी शक्कल लढवली. त्यांच्या दारात सध्या पाणी आल्याने मला खूप समाधान मिळाले. मी केवळ माझे कर्तव्य केले आहे.- दत्तात्रेय पिंपरकर, सरपंच, जांबरुंग ग्रामपंचायत
ठोंबरवाडीतील आदिवासी महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 12:06 AM