- सिकंदर अनवारेदासगाव : महाड तालुक्यात अनेक गावात गेली काही वर्षे बंद असलेले मोबाइल टाॅवरची विनाशेती दंडात्मक वसुली झालेली नाही. यामुळे महसूल विभागाने आर्थिक वर्ष समाप्तीआधी मोबाइल टाॅवरकडून दंड वसुली मोहीम सुरू केली आहे. या दंडात्मक वसुलीच्या नोटीसा शेतकऱ्यांना देण्यात आल्याने आणि कंपन्यांनी बंद केलेले टाॅवर जागीच पडून राहिल्याने शेतकऱ्यांसाठी हे बंद टाॅवर डोकेदुखीच ठरली आहेत.आर्थिक वर्ष समाप्तीसाठी महसूल विभागाने विनाशेती दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. यामध्ये तालुक्यातील सर्व मोबाइल टाॅवरचादेखील समावेश आहे. जागेचा वापर विनाशेती न करताच व्यावसायिक पद्धतीने होत असल्याने शासनाने या मोबाइल टाॅवरकडून दंड वसुली सुरू केली आहे; मात्र महाड तालुक्यात अनेक गावातील मोबाइल टाॅवर गेली अनेक वर्ष बंद आहेत. या मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या बंद झाल्या तर काही कंपन्या अन्य कंपन्यांमध्ये सामील झाल्या आहेत. मोबाइल टाॅवर बसवताना शेतकऱ्यांबरोबर होत असलेल्या करारनाम्यानुसार शेतकऱ्याला जमीन भाडे दिले जाते. जमीन विनाशेती केलेली नसल्याने महसूल विभागाकडून शेतकरी आणि मोबाइल टाॅवर कंपन्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत; मात्र महाड तालुक्यात ज्या ठिकाणी मोबाइल टाॅवर बंद झाले आहेत, त्या कंपन्यांकडून शेतकऱ्याला कोणतीच पूर्वकल्पना देण्यात आली नाही. अगर जमिनीतील मोबाइल टाॅवर हटवण्यात आलेला नाही. प्रशासनालादेखील याबाबत कोणतीच कल्पना देण्यात आलेली नसल्याने जमीन वापराबाबत शेतकऱ्यांना नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. कंपन्यांचे पत्ते बदलण्यात आलेले असल्याने त्यांचा मात्र संपर्क होत नाही आणि जमीन भाडेदेखील देण्यात आलेले नाही. यामुळे शेतकरी कात्रीत सापडला आहे. महाड तालुक्यातील बंद मोबाइल टाॅवरमहाड तालुक्यात जवळपास १५ मोबाइल टाॅवर बंद अवस्थेत आहेत. यामध्ये एअरटेल, रिलायन्स, जी.टी.एल., टाटा मोबाइल या कंपन्यांचे महाड शहर, शिरगाव, बारसगाव, टोळ बु., वहूर, दासगाव, गावडी, झोळीचाकोंड, काचले, कोतुर्डे, करंजाडी, लोखंडेकोंड यांचा समावेश आहे. या बंद टाॅवरमुळे महसूल विभागाचा लाखो रुपयांचा दंड थकीत आहे. गव्हाडी गावातील टाॅवरकडून सुमारे १,९३,८४०, महाडमधील टाॅवरकडून २,०१,६८०, दासगाव टाॅवरकडून १,९९,७२०, टोळ बु.मधील टाॅवरकडून ४,७३,९२० रुपये वसूल होणे आहेत. कंपनीमालक आणि शेतकरी दोघांनादेखील नोटीसा देण्यात येतात, असे नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांनी सांगितले. या नोटीसा प्राप्त होताच शेतकऱ्यांना धक्का बसतो; मात्र कंपन्या दाद देत नसल्याने गेली तीन ते चार वर्षांची थकबाकी राहिली आहे. गेली तीन वर्षांपासून माझ्या जमिनीमधील मोबाइल टाॅवर बंद आहे. कंपनीच्या लोकांशी संपर्क होत नाही. कंपनीने जमीन भाडेदेखील दिलेले नाही आणि विनाशेती वापर दंडदेखील भरलेला नाही, यामुळे महाड महसूल विभागाकडून आम्हाला नोटीसा येत आहेत.– लक्ष्मण अंबावले शेतकरी गाव गव्हाडी,
बंद मोबाइल टाॅवर शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी, महसूल विभागाच्या शेतकऱ्यांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 12:14 AM