नांदगाव/मुरुड : राज्य निवडणूक आयोगाने नुकतेच एक पत्र जारी करून आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक या राज्य मंत्रिमंडळाने ३० आॅगस्टला जो निर्णय घेतला आहे त्याप्रमाणेच निवडणूक पद्धत अवलंबण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी व कोकण आयुक्त यांना बजावण्यात आले आहेत. त्यामुळे थेट नगराध्यक्ष पद्धत रद्द होणार व पूर्वीप्रमाणेच नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडला जाईल या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.याबाबत अनेक अफवा व्हॉट्स अॅपवर पसरवण्यात येऊन त्यावर काही बातम्या सुद्धा वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. परंतु आता राज्य निवडणूक आयोगानेच २३ सप्टेंबर २०१६ रोजी पत्र जारी करून जनतेमधून थेट नगराध्यक्ष व बहुसदस्य प्रभाग पद्धती प्रमाणे नगरसेवक निवडले जाणार असे स्पष्ट नमूद केले आहे.त्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांना अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.आता फक्त थेट नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होणे बाकी आहे.ते जाहीर होताच प्रचाराला वेग प्राप्त होणार आहे. प्रत्येक पक्षाचे आरक्षण काय पडणार याकडे विशेष लक्ष आहे.; परंतु आरक्षण जाहीर न झाल्याने अस्वस्थता वाढत आहे. मुरु ड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने आपापला उमेदवार तयार ठेवला आहे. जर महिला आरक्षण पडले तर योग्य उमेदवाराचा शोध घेणे फार कठीण भाग होऊन बसणार आहे. परंतु पुरु ष आरक्षणाला खूप मोठी स्पर्धा दिसून येत आहे. आता थेट नगराध्यक्ष निवडणूक पद्धत राहणार असल्याने योग्य उमेदवाराचा काही पक्ष शोध सुद्धा घेताना दिसत आहेत. लवकरच थेट नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर व्हावे अशी प्रत्येक राजकीय पक्षाची इच्छा आहे.
नगराध्यक्ष पद्धतीवर लवकरच शिक्कामोर्तब
By admin | Published: September 26, 2016 2:19 AM