उरण : तालुक्यात दिव्यांगांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, शिबिराचे आयोजक उरण तहसीलदार कल्पना गोडे आणि प्रमुख मार्गदर्शक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी हेच तब्बल दोन तास उशिरा पोहचल्याने जमलेल्या सुमारे ७०० दिव्यांगांना ताटकळत बसण्याची वेळ आली. आयोजक आणि मार्गदर्शकांकडूनच कार्यक्रमासाठी झालेल्या उशिरामुळे दिव्यांगांनी संताप व्यक्त केला.उरण तालुक्यातील शहरी भागात १७२ तर ग्रामीण भागात ९२८ असे एकूण ११०० दिव्यांग व्यक्ती आहे. त्यांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हा रुग्णालयात वारंवार हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे नाहक त्रास आणि वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे उरण तालुक्यातील सर्व दिव्यांगांना आवश्यक दाखले आणि त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी उरण तहसीलदार आणि तालुक्यातील माउली अपंग संस्था व बेरोजगार अपंग जीवन संस्था आदी संघटनांच्या माध्यमातून बुधवारी आरोग्य शिबिरासाठी आयोजन करण्यात आले होते. आयोजक उरण तहसीलदार कल्पना गोडे आणि प्रमुख मार्गदर्शक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत जेएनपीटी कामगार वसाहतीमधील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित केलेल्या या शिबिराचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. शिबिरात तपासणी आणि दाखल्यासाठी आलेल्या परिसरातील सहाशेहून अधिक अपंगांनी हजेरी लावली होती. मात्र १० वाजल्यापासून सुरू होणारा कार्यक्रम १२ वाजल्यानंतरही सुरू झालेला नव्हता. कारण आयोजक उरण तहसीलदार कल्पना गोडे आणि प्रमुख मार्गदर्शक डॉ. अजित गवळी कार्यक्रमालाच दोन तास उशिरा आले. त्यामुळे दिव्यांगांकडून संताप व्यक्त करण्यात आला.दिव्यांगांचा वाया जाणारा वेळ, पैसा वाचविण्यासाठी उरणमध्ये आरोग्य शिबिर भरविण्यात आलेले आहे. मात्र, आयोजकच उशिरा आल्याने येथेही त्यांना ताटकळत राहावे लागले. याबाबत बोलताना, आयुक्तांकडे मिटिंग असल्याने उशीर झाल्याची प्रतिक्रिया उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनी व्यक्त केली.
उरणमध्ये आरोग्य शिबिर : आयोजकांच्या विलंबामुळे दिव्यांग ताटकळत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 3:29 AM