कळंबोली : राज्य सरकारबरोबरच आता केंद्र सरकारनेही तिजोरी रिकामी असल्याचा हवाला देत, आरोग्य निधीत कपात केली आहे. केंद्र सरकारकडून दरवर्षी प्राथमिक आरोग्य केंद्राला १.७५ लाखांचा निधी देण्यात येत होता. या निधीत यंदा ४५ टक्क्यांची कपात करण्यात आल्याने यंदा आरोग्य केंद्राला केवळ ९८ हजार रु पयेच निधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे इतर ठिकाणाप्रमाणेच पनवेल तालुक्यातील आरोग्य केंद्र अडचणीत सापडले आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण जनतेच्या आरोग्याचा आत्मा असून, निधी कपातीमुळे ग्रामीण आरोग्य धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीतून एक लाख रुपयांची औषध खरेदी, उरलेल्या निधीतून आरोग्य केंद्राचे मेंटेनन्स व छोट्या उपकरणांवर खर्च करण्यात येत होता. ज्या आरोग्य केंद्रात रुग्णांची संख्या अधिक आहे, तेथे औषधांवर होणारा एक लाखांचा निधीही कमी पडतो आहे. आता ९८ हजारांत काय करणार, असा सवाल आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांचा आहे. पनवेल तालुक्यात आपटे, वावंजे, नेरे, अजिवली, गव्हाण याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे आहेत. सरकारने निधीत कपात केल्याने ही आरोग्य केंद्रे अडचणीत सापडली आहेत. (वार्ताहर)
आरोग्य केंद्र आर्थिक संकटात
By admin | Published: January 19, 2016 2:21 AM