- कांता हाबळेनेरळ : नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दीड महिन्यांपासून कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. नाइलाजाने गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांत उपचार करून घ्यावे लागत असून, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे रुग्णांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.कर्जत तालुक्यातील नेरळ शहरामध्ये रायगड जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. दुर्गम, डोंगराळ भागातून या ठिकाणी ग्रामस्थ उपचार घेण्यासाठी येतात; परंतु या आरोग्य केंद्राला समस्यांनी ग्रासल्याने रुग्णांची निराशा होते.नेरळ परिसरातील गोरगरीब गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले आहे; परंतु हे आरोग्य केंद्र रुग्णांना सोयी-सुविधा देण्यास नेहमीच अपुरे पडत आहे. आरोग्य केंद्र नेहमीच चर्चेत राहिले आहे. कधी वैद्यकीय अधिकारीपद रिक्त तर कधी कर्मचाऱ्यांची पदे अपूर्ण, अशा एक ना अनेक समस्यांनी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रासले आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. दीड महिन्यांपूर्वी येथील डॉक्टर संकेत पवार यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी डॉ. खालिद अन्सारी यांची नियुक्ती करण्यात आली होती; परंतु या डॉक्टरांना नेरळ शहरातील एका राजकीय पक्षाच्या पुढाºयाने दमदाटी केल्याने ते आरोग्य केंद्र सोडून गेले आहेत, त्यामुळे आता रुग्णालयात एकही डॉक्टर नसल्याने रुग्णांना खासगी रु ग्णालयात उपचार घेण्याशिवाय पर्याय नाही.गतवर्षी रायगड जिल्हा परिषदेकडून आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणासाठी २३ लाख रु पयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. लाखो रु पये खर्चूनही आरोग्य केंद्र आजारी असल्याचेच चित्र आहे. अपुºया कर्मचारी संख्येमुळे रु ग्णाची गैरसोय, सफाई कामगारांअभावी स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर या ठिकाणी वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती करावी, तसेच इतर रिक्त पदेही भरावीत, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.डॉ. संकेत पवार यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी डॉ. खालिद अन्सारी यांची नेमणूक करण्यात आली होती; परंतु नेरळमधील एका राजकीय पुढाºयाने या डॉक्टरांना दमदाटी केल्याने तेही सोडून गेले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येईल.- सी. के. मोरे,तालुका वैद्यकीय अधिकारी, कर्जतनेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात महिनाभरापूर्वी एका एमबीबीएस डॉक्टरची नेमणूक करण्यात आली होती; परंतु त्यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी देण्यात आल्याने राजीनामा देऊन निघून गेले, त्यामुळे येथे दुसरे कोणते डॉक्टर येण्यास तयार होत नाहीत; परंतु या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी बोलणे झाले आहे. लवकरच नवीन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येईल.- अनसूया पादिर,जिल्हा परिषद सदस्या, नेरळ