आरोग्य केंद्र डॉक्टरांच्या प्रतीक्षेत
By admin | Published: November 3, 2015 12:49 AM2015-11-03T00:49:24+5:302015-11-03T00:49:24+5:30
सुधागड तालुका हा आदिवासीबहुल असून येथील आदिवासी बांधव, गोरगरीब शेतकरी यांना जांभूळपाडा येथील आरोग्य केंद्रावरच जावे लागते. मात्र येथील आरोग्य केंद्रात पूर्णवेळ
पाली : सुधागड तालुका हा आदिवासीबहुल असून येथील आदिवासी बांधव, गोरगरीब शेतकरी यांना जांभूळपाडा येथील आरोग्य केंद्रावरच जावे लागते. मात्र येथील आरोग्य केंद्रात पूर्णवेळ तसेच रात्री वस्तीकरिता डॉक्टर उपलब्ध नसल्याने येथील रुग्णांचे हाल होत आहेत.
या आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने पंचक्रोशीतील तसेच दुर्गम डोंगराळ भागात नागरिकांना, रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या विभागातील नागरिकांनी व आदिवासी बांधवांची विकास संस्था ही आक्रमक झाली असून लवकर जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी डॉक्टरची तातडीने नेमणूक करावी, अशी मागणी या संस्थेचे अध्यक्ष रमेश पवार व गौसखान पठाण यांनी पाली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागणीची लवकरात लवकर पूर्तता न झाल्यास या संघटनेने जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)
बंधपत्रित डॉक्टरांचा अकरा महिन्यांचा कालावधी संपल्याने महिनाभरापासून येथे डॉक्टर नाही. लवकरच डॉक्टरच्या नेमणुकीसाठी पंचायत समिती पालीमार्फत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे आम्ही पाठपुरावा करीत आहोत. लवकरच डॉक्टर उपलब्ध होतील.
- संजय भोये, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, पाली.