आरोग्य मेळाव्यात ४५०० रुग्णांची तपासणी; आदिवासी बांधवांनी घेतला मोठा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 12:27 AM2018-10-12T00:27:51+5:302018-10-12T00:28:05+5:30
रायगड जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने कर्जतमध्ये आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय आरोग्य मेळाव्याचा समारोप ११ आॅक्टोबर रोजी झाला. कर्जत तालुक्यात झालेल्या आरोग्य मेळाव्याचा आदिवासी बांधवांनी मोठा लाभ घेतला.
नेरळ : रायगड जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने कर्जतमध्ये आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय आरोग्य मेळाव्याचा समारोप ११ आॅक्टोबर रोजी झाला. कर्जत तालुक्यात झालेल्या आरोग्य मेळाव्याचा आदिवासी बांधवांनी मोठा लाभ घेतला. तीन दिवसांत ४५०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्याप्रसंगी समारोपीय कार्यक्रमात रायगड जिल्ह्याचे शिक्षण, क्रीडा आणि आरोग्य सभापती नरेश पाटील यांनी या मेळाव्याला सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि सर्व आरोग्य कर्मचारी यांचे कौतुक करत, ‘तुम्ही यापुढेही आपल्या कामात असेच सातत्य ठेवून जनतेची सेवा करत राहा’, असे सांगितले.
या वेळी कर्जत तालुक्यातील २ हजार ६०० हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली.
रायगड जिल्ह्यातील पनवेल-२६, म्हसळा-७, माणगाव-११४३, अलिबाग-५०, पेण-४०, सुधागड- १०० आणि खालापूर-६०९ अशा रुग्णांनी तपासणी केली, तर कर्जत तालुक्यातील २६०० हून अधिक रुग्णांनी आपली उपस्थिती लावून तपासणी करून घेतली.
कर्जत तालुक्यातील कुपोषण लक्षात घेऊन आज आरोग्य मेळाव्याच्या तिसºया दिवशी ‘सॅम’ आणि ‘मॅम’ श्रेणीतील २०० बालकांची तपासणी एमजीएमच्या डॉक्टरांनी केली. त्याच वेळी जिल्ह्यातील १५० हून अधिक दिव्यांग रुग्णांचीही तपासणी करण्यात आली. याप्रसंगी बोलताना जिल्हा परिषदेचे आरोग्य समिती सभापती नरेश पाटील यांनी असे आरोग्य मेळावे भविष्यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यात आयोजित करण्याचे आश्वासन दिले. कर्जत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे यांनी आभार मानले.
या जिल्हा आरोग्य मेळाव्यात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यातील रुग्णांची संख्या मोठी होती. या मेळाव्यात तपासलेल्या १५० रुग्णांवर चांगल्या उपचारांची गरज असून ते उपचार एमजीएम हॉस्पिटल येथे दिले जाणार आहेत.
- डॉ. सचिन पाटील,
जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड जिल्हा