आरोग्य विभागालाच उपचारांची गरज, अंतर्गत राजकारणाचाही कामकाजावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 05:38 AM2020-08-05T05:38:28+5:302020-08-05T05:39:04+5:30
सक्षम अधिकाऱ्यांची कमतरता : मुख्य आरोग्य अधिकारी पदही अस्थिर; अंतर्गत राजकारणाचाही कामकाजावर परिणाम
नामदेव मोरे
नवी मुंबई : श्रीमंती व विकासाचा ढोल वाजवणाºया नवी मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग शहरवासीयांचा उत्तम सुविधा देण्यास सक्षम नसल्याचे पाच महिन्यांत निदर्शनास आले आहे. मुख्य आरोग्य अधिकाºयासह कोविडची जबाबदारी असणारे उपायुक्त महत्त्वाच्या क्षणी सुट्टीवर गेले आहेत. सक्षम अधिकारी नसल्याने जबाबदारीची वारंवार खांदेपालट करावी लागत आहे. आरोग्य विभागांतर्गत कुरघोडीच्या राजकारणानेही पोखरला गेला असून, या विभागालाच उपचारांची गरज निर्माण झाली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक वर्षी आरोग्य विभागावर १00 ते १५0 कोटी रुपये खर्च करत आहे. रुग्णालयीन इमारतींची बांधणी व दुरुस्तीवरही कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत, परंतु एवढा खर्च करूनही शहरवासीयांना चांगल्या सुविधा देण्यात अपयश येऊ लागले आहे. नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या साडेसोळा हजारांपेक्षा जास्त झाली आहे. आयुक्तांसह सर्व प्रशासन महामारी रोखण्यासाठी प्रयत्न करत असताना, ऐन मोक्याच्या क्षणी मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.बाळासाहेब सोनावणे आजारी पडले आहेत. आयुक्तांनी निष्काळजीपणाचा ठपका ठेऊन कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर ते अचानक अजारी पडल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. आरोग्य विभागातील पहिले उपायुक्त डॉ.राहुल गेठे यांच्यावर कोविडची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती, परंतु त्यांनीही महत्त्वाच्या क्षणी महानगरपालिकेतून पळ काढला आहे. सद्यस्थितीमध्ये डॉ.दयानंद कटके यांच्याकडे तात्पुरती या विभागाची जबाबदारी सोपविली आहे.
वास्तविक, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून महानगरपालिकेला सक्षम अधिकारी सापडलाच नाही. वारंवार जबाबदारी बदलावी लागत आहे. सुरुवातीला परिमंडळ दोनचे उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली, परंतु त्यांच्यावर टीका होऊ लागल्यामुळे त्यांचे अधिकार कमी करण्यात आले. साथ नियंत्रण अधिकारी डॉ.उज्ज्वला ओतुरकर या कोविडविषयी काम पाहात होत्या. त्यांच्याकडील कामही काढून घेण्यात आले. काही दिवस डेंटिस्ट असणाºया डॉक्टरवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. यानंतर, पुन्हा खांदेपालट करून कोविडविषयी जबाबदारी प्रशासनाचा पुरेसा अनुभव नसलेल्या डॉ.राहुल गेठे यांच्यावर सोपविण्यात आला. तेही प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. गेठे यांनी महानगरपालिकेच्या सेवेतून मुक्त करण्याचा अर्ज केला असून, त्यांनी जबाबदारीमधून पळ काढल्याची टीका होऊ लागली आहे.
कर्मचाऱ्यांची कमतरता
आरोग्य विभागावर खर्च करण्यासाठी लोकप्रतिनिधींनीही कधीच नाराजी व्यक्त केली नाही.डॉक्टर, कर्मचाºयांची कमतरता असून, आयत्या वेळी भरतीची वेळ पालिकेवर आली आहे.
कुरघोडीचे राजकारण
च्नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाएवढे कुरघोडीचे राजकारण इतर कोणत्याच विभागात पाहावयास मिळत नाही.
च्महत्त्वाचे पद मिळविण्यासाठी एकमेकांविरोधात कुरघोडी करण्याचे प्रकार पाहावयास मिळतात. काही महत्त्वाच्या पदांवर वर्षानुवर्षे ठरावीक अधिकारी ठाण मांडून बसले आहेत.
च्अनेकांनी मुख्यालयाच्या बाहेर फारसे काम केलेले नाही. प्रत्यक्ष रुग्णालय व नागरी आरोग्य केंद्रात काम करण्यात अनेक जण नकार देतात.
आरोग्य अधिकारी पदही अस्थिर
महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी हे पदच अस्थिर झाले आहे. अनेक वेळा अधिकारी बदलले आहेत. काही दिवस डॉ.दयानंद कटके यांच्याकडे जबाबदारी दिली. शासनाकडून बाळासाहेब सोनावणे यांची नियुक्ती करण्यात आली. सद्यस्थितीमध्ये ते आजारी असल्यामुळे पुन्हा कटके यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. मुख्य आरोग्य अधिकारी पदासाठी सक्षम अधिकारी नसल्याने, शहरवासीयांना सुविधा देता येत नाहीत.