कर्जत : तालुक्यातील खैरपाडा गावातील चार आणि आदिवासी वाडीमधील एका व्यक्तीचा नोव्हेंबर महिन्यात अचानक मृत्यू झाला होता. कावीळ आणि हृदयविकाराचा झटका, यामुळे मृत्यू झालेले असतानाही कोरोनाची असलेली दहशत यामुळे खैरपाडा गावातील लोकांना आजूबाजूच्या गावातील लोक जवळ करीत नव्हते. कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राने राबविलेल्या कठोर उपाययोजनांनमुळे खैरपाडा येथील आकस्मिक मृत्यूचे प्रमाण थांबले आहे.
तालुक्यातील वारे ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या खैरपाडा गावात ९ नोव्हेंबर रोजी एका व्यक्तीचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर, आठ दिवसांत गावातील आणखी तीन व्यक्तींचे निधन झाले, तर बाजूच्या वाडीमधील एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर कोरोनाच्या असलेल्या दहशतीमुळे आजूबाजूच्या गावकऱ्यांनी खैरपाडा गावाला अक्षरशः बाजूला करून ठेवले होते. खैरपाडा गावातील कोणत्याही व्यक्तीला आजूबाजूला असलेल्या गावातील लोक जवळ करीत नव्हते. स्थानिक दूधवाले यांचे घरोघरी पोहोचणारे दूधही कोणी घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे त्या दूधवाल्यांचे आर्थिक नुकसान होत होते, तर दुसरीकडे भाजीपाला पिकविणारे शेतकऱ्यांचा भाजीपाला शेजारच्या गावातील लहानशा बाजारपेठेत कोणी विकत घेत नव्हता आणि कंदमुळे विकायला नेली असता, तीही कोणी विकत घेत नव्हते. त्यात खैरपाडा गावातील त्या चार व्यक्तींपैकी दोन व्यक्तींचे मृत्यू कावीळ झाल्याने झाले असल्याचे बोलले जात होते. दोन व्यक्तींना हृदय विकाराचा झटका आला होता. मात्र, कोरोनाची भीती सर्वत्र घातली जात असल्याने नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात त्या गावात कोणी जायला तयार नव्हता. कोणत्याही मृत व्यक्तीच्या घरी बाहेरून कोणीही सांत्वन करायला जात नव्हते.
कावीळमुळे मृत्यू झाले असल्याची चर्चा सुरू असल्याने, कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राने खैरपाडा गावात आरोग्य शिबिर घेतले. त्या शिबिरात गावातील १४३ लोकांची तपासणी करण्यात आली असता, त्यातील कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची लक्षणे नसल्याचे स्पष्ट झाले. कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळाजी पुरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सी.के. मोरे यांनी कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत यादव यांच्यासोबत ग्रामस्थांसोबत चर्चा केली आणि त्यानंतर दररोज आठ दिवस कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक हे खैरपाडा गावात येऊन प्रत्येक घरी फिरून माहिती घेत होते.
चार व्यक्तींचे मृत्यू दूषित पाण्यामुळे कोरोनाची लक्षणे नसल्याने कर्जत पंचायत समिती आणि वारे ग्रामपंचायत यांनी गावातील सर्व २६ बोअरवेलमधील पाणी तपासणीसाठी नेले. अलिबाग येथील प्रयोगशाळेतून त्या पाणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर गावातील चार व्यक्तींचे झालेले मृत्यू हे दूषित पाण्यामुळे झाले नाहीत, हे सिद्ध झाले. आरोग्य विभागाने घेतलेल्या आरोग्य शिबिर, तसेच सतत आठ दिवस प्रत्येक घरी जाऊन व्यक्तींची केलेली तपासणी, त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात निर्माण झालेली भीती कमी होण्यास मदत झाली, तर कोरोनाची लक्षणे कोणाला नसल्याने आपल्या गावातील चार व्यक्तींचे मृत्यूही कोरोनामुळे झाले नाहीत, हेही स्पष्ट झाले आहे. परिणामी, गावातील व्यक्तींच्या मनात निर्माण झालेली भीती निघून गेली आणि मागील १० दिवसांपासून खैरपाडा गावात कोणत्याही नवीन मृत्यूची नोंद झाली नाही आणि गावातील कोणत्याही व्यक्तीला कोणताही आजार झालेला नाही. त्यामुळे मृत्यूची निर्माण झालेली भीती निघून गेली असून, खैरपाडा गावात सध्या शांतता आहे.