माथेरानमध्ये आरोग्यसुविधाही ब्रिटिशकालीन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 12:41 AM2020-08-01T00:41:39+5:302020-08-01T00:42:00+5:30
स्थानिकांची गैरसोय : बेरामजी जिजीभाई रुग्णालय आधुनिकीकरणाच्या प्रतीक्षेत
लोकमत न्यूज नेटवर्क
माथेरान : माथेरान व परिसरातील आदिवासी बांधवांसाठी, तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांना उपचारासाठी येथे असलेले बेरामजी जिजीभाई रुग्णालय आधुनिकीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. एकशे अठरा वर्षे उलटून गेल्यानंतरही हे रुग्णालय आजही जैसे थे याच निकषावर सुरू असल्याने माथेरानमधील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासून गैरसोय होत आहे.
शंभर वर्षांहून अधिक जुनी परंपरा असलेले ब्रिटिशकालीन रुग्णालय आजही माथेरानमध्ये सुरू आहे. सेठ बेरामजी जिजीभाई यांच्या स्मरणार्थ इस.१८७२च्या ट्रस्ट सेटलमेंटमधून शेठ रुस्तमजी बेरामजी जिजीभाई यांनी या रुग्णालयाची इमारत बांधण्याकरिता आणि ती सज्ज करण्याकरिता १३ हजार १०० रुपयांची रक्कम दिली. ३ जून, १९०२मध्ये हे रुग्णालय सुरू झाले. म्हणजे शंभर वर्षांपूर्वी सुरू झालेले हे रुग्णालय आजही त्याच स्थितीत आहे. माथेरानमधील पर्यटन या काळात भरभराटीस आले. मात्र, दुर्दैवाने माथेरानमधील या रुग्णालयातील सुविधा मात्र दिवसेंदिवस कमी-कमी होत गेल्या. येथे दरवर्षी हजारो पर्यटक येतात, हा भाग डोंगराचा प्रदेश तर येथील प्रवासाचे प्रमुख वाहन घोडा, त्यामुळे येथे अनेक वेळा अपघात होत असतात, तर येथील स्थानिकांनाही जुजबीच उपचार येथे मिळत आहेत. अनेक वर्षांपासून हे रुग्णालय अद्ययावत व्हावे, म्हणून मागणी सुरू आहे. मात्र, त्याकडे शासनाने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. फक्त अपघात झाल्यावरच हा प्रश्न उपस्थित केला जातो व नंतर त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याची मागील काही काळात प्रचिती सर्वांना आली आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजविला आहे, रुग्णालये कमी पडत आहेत आणि माथेरानमध्ये शासनाचे स्वत:चे रुग्णालय असताना, येथील रुग्णांना उपचारासाठी बाहेर जावे लागत आहे. तुटपुंज्या सुविधांसह येथील वैद्यकीय अधिकारी माथेरानकरांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक वेळा मागणी करूनही शासन दाद देत नसल्याची खंत त्यांनाही आहे.