वीटभट्ट्यांच्या धुरामुळे आरोग्याला धोका

By Admin | Published: March 5, 2017 02:59 AM2017-03-05T02:59:35+5:302017-03-05T02:59:35+5:30

वीट ही बांधकाम व्यवसायातील अविभाज्य भाग आहे. सध्या रायगड जिल्ह्यात अनेक सरकारी व खासगी प्रकल्प विकसित होत आहेत. बांधकाम व्यवसायासाठी आवश्यक

Health risk due to brick kiln smoke | वीटभट्ट्यांच्या धुरामुळे आरोग्याला धोका

वीटभट्ट्यांच्या धुरामुळे आरोग्याला धोका

googlenewsNext

दासगाव : वीट ही बांधकाम व्यवसायातील अविभाज्य भाग आहे. सध्या रायगड जिल्ह्यात अनेक सरकारी व खासगी प्रकल्प विकसित होत आहेत. बांधकाम व्यवसायासाठी आवश्यक विटेची मागणी पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या लावल्या जातात. महसूल विभागाचे नियम धाब्यावर बसवून तयार करण्यात आलेल्या या वीटभट्ट्या येथील ग्रामस्थांच्या आरोग्यास धोकादायक ठरत आहेत. महसूल विभागाने घालून दिलेल्या नियमावलीची राजरोसपणे पायमल्ली होत असताना महसूल विभागाकडूनच याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
बांधकाम व्यवसायामध्ये खूप झपाट्याने प्रगती होत आहे. नवनवीन तंत्रज्ञान बांधकामासाठी वापरले जात आहे. त्याचप्रमाणे बांधकामातील महत्त्वाचा घटक असलेली वीटदेखील वेगळ्या आकारात नवीन तंत्रात उपलब्ध होत आहेत. औद्योगिक वसाहतीतून निघणारे फल्यहॅश, जिप्सम तसेच सिमेंट क ाँक्रीटच्या विटा बाजारात उपलब्ध आहेत. तरीदेखील पारंपरिक पद्धतीने बनविण्यात येणाऱ्या विटेला मोठ्या प्रमाणात ग्राहक आणि व्यावसायिकांची पसंती आहे. शेतातील माती, भाताचा कोंडा खळ्यामध्ये कुजवून या विटेची बांधणी केली जाते. पुढे भट्टीमध्ये तापवून मातीची ही वीट पक्की केली जाते. या भट्टीसाठी जळाऊ लाकूड, दगडी कोळसा, भाताचा कोंडा आदींचा वापर केला जातो. विटांची ही भट्टी १० ते १५ दिवस जळती ठेवली जाते.
वीट पक्की करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या या भट्टीमध्ये दगडी कोळसा, जळाऊ लाकूड आणि कोंडा यांचा वापर केला जातो. हे तिन्ही घटक जळत असताना मोठ्या प्रमाणात धूर निर्माण करतात. यावेळी निर्माण होणारी राख धुरासोबत परिसरात पसरत असते. यामुळे वीटभट्टीच्या शेजारच्या परिसरात आरोग्यास घातक असे वातावरण तयार होते.
ग्रामस्थांच्या आरोग्याचा विचार करता शासनाने वीटभट्ट्यासाठी कडक नियमावली बनवल्या आहेत. त्यामध्ये वीटभट्टीचे रस्त्यापासून अंतर, रहिवासी वस्तीपासूनचे अंतर याचा विशेष उल्लेख आहे. वीटभट्टीला परवानगी देताना वीटभट्टी मालकाला या नियमावलीची समज महसूल विभागामार्फत दिली जाते. नियम चुकवल्यास दाखल होणारा गुन्हा आणि दंड याची देखील माहिती दिली जाते. मात्र, केवळ व्यावसायिक विचार करणारे हे वीट व्यावसायिक ग्रामस्थांच्या आरोग्याचा विचार न करता मुख्य रस्ता आणि रहिवासी भागातच वीटभट्ट्या उभारत आहेत. यामुळे रहिवासी भागात वीटभट्ट्याच्या धुराचा त्रास होतोच, तर वीटभट्टी तयार झाल्यानंतर अगर वीटभट्टी खुली करताना यातील राख वाऱ्यासोबत उडून ग्रामस्थ आणि रस्त्यावरील प्रवाशांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. (वार्ताहर)

वीटभट्टीसाठीचे नियमही धाब्यावर
महाड तालुक्यात शेकडो शेकडो वीटभट्ट्या सुरू असून, धुराने संपूर्ण महाड तालुका ग्रासला आहे. सकाळच्या वेळी या धूर आणि धुक्यामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रात होतो. मात्र, चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या या भट्ट्यांवर महसूल विभागामार्फत कारवाई करताना नरमाईचे धोरण स्वीकारले जात असल्याने या व्यावसायिकांचे फावले आहे.

वीटभट्टीच्या होणाऱ्या धुरामुळे खोकला, दमा, डोळ्यात जळजळ होणे, दृष्टी कमी होणे असे अनेक आजार मनुष्याला उद्भवू शकतात.
- डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, महाड

Web Title: Health risk due to brick kiln smoke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.