दासगांव : महाड तालुक्यातील सापे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागेश्वरी नदीतील पाणी प्रदूषित झाल्याने ही पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही परिस्थिती असून याकडे औद्योगिक वसाहत नगरपंचायत समिती योग्यप्रकारे लक्ष देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महाड तालुक्यातील खाडी पट्ट्यातील नडगावतर्फे तुडील ग्रुपग्रामपंचायत हद्दीत सापे हे गाव आहे. या गावासाठी गेली ३० वर्षे नळपाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नागेश्वरी नदीवर जॅकवेल बांधून ही योजना कार्यान्वित केली आहे. बारमाही वाहणाऱ्या नागेश्वरी नदीमुळे सापे गावाला कधीच पाणीटंचाई झाली नव्हती. मात्र गतवर्षीपासून येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.नागेश्वरी नदी रावढळ गावाजवळ सावित्री खाडीला मिळते. सावित्री खाडीमध्ये महाड औद्योगिक वसाहतीतील प्रदूषित सांडपाणी सोडले जात आहे. हे पाणी भरतीच्या वेळी रावढळ पुलापासून पुढे नागेश्वरी नदीत जाऊन मिसळते. यासाठी रावढळ पुलानजिक बंधारा बांधण्यात आला होता. हा बंधारा गेली दोन वर्षे नादुरुस्त अवस्थेत असल्यामुळे नागेश्वरीचे दूषित पाणी जॅकवेलच्या माध्यमातून ग्रामस्थांपर्यंत जाते. या प्रदूषणाचा फटका सापे ग्रामस्थांना बसला आहे. सापे ग्रामपंचायतीच्या नळपाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या पाण्यावरच गावातील आदिवासीवाडी, बौद्धवाडी, सुकुमवाडी, रसाळवाडी, मोहल्ला या वाड्यांतील जवळपास ८०० लोकसंख्या अवलंबून आहेत.दूषित पाण्यामुळे अंगाला खाज सुटणे, घरातील भांडी काळी पडणे असे त्रास ग्रामस्थांना सहन करावे लागत आहेत. हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवालही तालुका आरोग्य विभागाने दिला आहे. गावात केवळ एकच विंधन विहीर (बोरिंग) असल्याने सर्व भार या विंधन विहिरीवर पडत आहे. तेही पाणी दोन महिन्यांनंतर मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात दुसरी एक विहीर आहे. मात्र या विहिरीचे पाणी जेमतेम फेबु्रवारीपर्यंतच टिकते. यामुळे नळपाणीपुरवठा योजनेवरच सापे ग्रामस्थ अवलंबून आहेत, अशी माहिती गावातील पाणी कमिटीचे वसंत गोविंद भडवळकर, सचिव सत्यवान काशीराम रसाळ, ग्रामस्थ रामचंद्र धोंडू आगरे यांनी दिले. (वार्ताहर) दोन वर्षांपासून पाणीटंचाई होत आहे. नागेश्वरी नदीच्या प्रदूषणामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करीत आहेत. मात्र औद्योगिक वसाहतीने याची दखल घेतली नाही. आम्हाला पाणी मिळाले नाही तर आम्ही आंदोलन करणार- रजनी बैकर, सरपंच
दूषित पाण्याने आरोग्य धोक्यात
By admin | Published: December 04, 2015 12:25 AM