माता सुरक्षित घर सुरक्षित मोहिमेअंतर्गत आरोग्य सेवा, आजपासून सुरुवात
By राजेश भोस्तेकर | Published: September 26, 2022 03:37 PM2022-09-26T15:37:50+5:302022-09-26T15:39:04+5:30
जिल्ह्यातील मांतासाठी आरोग्य विभागाचा पुढाकार
अलिबाग : नवरात्रोत्सव सणाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील महिला माता, गरोदर माता याचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी माता सुरक्षित घर सुरक्षित हे अभियान जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून दहा दिवस राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालय येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत महिलाना उत्तम आरोग्य सुविधा आरोग्य विभागामार्फत दिली जाणार आहे. त्यामुळे महिला, मातांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतल्याने त्याचे आरोग्य सुधारण्यास लाभ होणार आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रमोद गवई, डॉ गजानन गुंजकर, जिल्हा रुग्णालय अधिकारी, परिचारिका, माता यावेळी उपस्थित होत्या. महिला याचे आरोग्य हे उत्तम असेल की घराचे आरोग्यही उत्तम असते. त्यामुळे घरातील महिला, माता सुरक्षित तर घर सुरक्षित असते असे मत डॉ किरण पाटील यांनी व्यक्त केले आहे. जिल्ह्यातील महिला, मातांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन ही पाटील यांनी केले आहे.
या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ५४ प्राथमिक आरोग्य केंद्रात, २८९ आरोग्य केंद्रात २ भरारी पथके यांच्यासह इतर आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत २१ वर्षावरील सर्व महिला माता, गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा, सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा, या व इतर आरोग्य सेवासुविधा प्रत्येक गावात एक दिवस आरोग्य व पोषण दिनाच्या दिवशी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर या कालावधीत महिला माता, गरोदर माता याची आरोग्य तपासणी तज्ञ डॉक्टरकडून केली जाणार आहे. महिलांच्या विविध आजारावर मोफत तपासणी, उपचार, समुपदेशन, औषधोपचार दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी केले आहे.