कोरोना लस घेण्यास आराेग्य कर्मचारी सज्ज, रायगड जिल्ह्यातील आराेग्य कर्मचारी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 12:55 AM2020-12-11T00:55:25+5:302020-12-11T00:55:58+5:30
Raigad News : देशातील सुमारे अडीच काेटी नागरिकांना ती टाेचण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आराेग्य यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील आराेग्य यंत्रणादेखील लस टाेचून घेण्यास सज्ज झाली आहे.
- संकलन : निखिल म्हात्रे
अलिबाग : गेल्या नऊ महिन्यांपासून काेराेनाच्या महामारीमुळे देशामध्ये अस्थिरतेचे आणि दहशतीचे वातावरण आहे. काेराेनामुळे लाखाे निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर त्याहून अधिक नागरिकांना काेराेनाची लागण झाली हाेती. याेग्य वेळी आराेग्य व्यवस्थेने टाकलेली पावले आणि नागरिकांच्या वाढलेल्या प्रतिकारशक्तीमुळे काेराेनाला काही अंशी राेखता आले आहे. काेराेना लसीवर झालेल्या संशाेधनानंतर लस आता उपलब्ध हाेत आहे. देशातील सुमारे अडीच काेटी नागरिकांना ती टाेचण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आराेग्य यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील आराेग्य यंत्रणादेखील लस टाेचून घेण्यास सज्ज झाली आहे.
रायगड जिल्ह्यात डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनीही लस टोचून घेण्यास सकारात्मक भूमिका घेतली आहे. लस टोचल्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करताना असुरक्षितता वाटणार नाही, असे मतही व्यक्त केले आहे. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लस घेण्यास हरकत नाही असे मत व्यक्त केले.
काेराेनाच्या लसीबाबत सरकारने घेतलेला निर्णय याेग्य आहे. आराेग्य कर्मचाऱ्यांनी प्रथम लस टाेचून घेणे आवश्यक आहे. तेव्हाच नागरिकांचा विश्र्वास संपादन करता येईल. लस सुरक्षित आहे. आराेग्य यंत्रणा २४ तास काेराेना कालावधीत काम करीत आहे. त्यामुळे आपण आधी सुरक्षित राहून रुग्णांची सेवा करू शकताे. सर्व आराेग्य यंत्रणा याबाबत सकारात्मकच आहे.
- डाॅ. सुहास माने, जिल्हा शल्य चिकित्सक, रायगड
प्रत्येकाची शरीररचना वेगळी असल्याने सरकारकडून कोविड-१९ काळात फ्रंटवर काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी लस कशा प्रकारे प्रतिकार करेल हे येणारा काळच ठरविणार आहे. त्यामुळे लस सर्वांनीच घ्यावी. लस घेतल्यास हार्ड इम्युनिटीसाठी मदत होणार आहे.
- डाॅ. राजीव तंबाळे,
वैद्यकीय अधिकारी, सामान्य रुग्णालय
‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ हे घोषवाक्य डोळ्यांसमोर ठेवून कोरोना महामारीत अगदी ग्राउंड लेवलला जाऊन काम केले आहे. महामारीला छेद देण्यासाठी येणारी लस कितपत फायदेशीर ठरेल हे येणारा काळच ठरविणार आहे.
- डाॅ. विक्रमजीत पडोळे,
वैद्यकीय अधिकारी,
सामान्य रुग्णालय
येणाऱ्या लसीच्या खूप मोठ्या प्रमाणात ट्रायल झाल्या आहेत. मात्र लसीसंदर्भात थोडं संमिश्र मत झालं आहे. या लसीपासून किती संरक्षण मिळेल हे येणारा काळच ठरविणार आहे. त्यामुळे आम्ही आजही द्विधा मन:स्थितीत आहोत.
- डाॅ. प्रीती प्रधान, वैद्यकीय अधिकारी, सामान्य रुग्णालय
कोरोना व्हायरस सुरू झाल्यापासून आजवर आम्ही हायरिस्कमध्ये येऊन काम करीत आहोत. पाॅझिटिव्ह रुग्णांना सतत ने-आण करण्याचे काम आम्ही करीत होतो. त्यामुळे आम्हाला आमच्या सेफ्टीसाठी लस देणे गरजेचे आहे.
- स्वप्निल म्हात्रे,
ॲम्ब्युलन्स चालक
गेले नऊ महिने कोरोनासोबत लढणाऱ्यांना मदतीचा हात देत आहोत. ग्राउंड लेवलवर जाऊन काम केले असल्याने प्रतिकारशक्ती वाढली आहे. सरकारच्या निर्णयाचे स्वागत करायला पाहिजे.
- पंकज बावकर,
औषध विभाग
लस आपल्या संरक्षणासाठी असल्याने आपल्या आरोग्यासाठी ती लाभदायक आहे. त्यामुळे सकारात्मक विचार ठेवून ती आपण घेतली पाहिजे. याची सुरक्षितता, त्याचे फायदे-ताेटे किती आहेत हा नंतरचा भाग आहे. आम्ही मात्र सज्ज आहाेत.
- कोमल धोत्रे, परिसेविका
मागील आठ महिन्यांपासून कोविड-१९ महामारीमुळे बऱ्याच लोकांचे मृत्यू होऊन अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. आता सरकारकडून लस येते आहे. ती लस प्रथम आरोग्य कर्मचारी व अशा वर्कर यांना देण्यात येणार आहे. ही अतिशय चांगली बाब आहे. लस दिल्यामुळे कोविड-१९ महामारीचे निर्मूलन लवकर होईल तसेच समाजात याचे महत्त्व पटवून देऊ जेणेकरून कोविडचे निर्मूलन होण्यास मदत होईल.
- सीमा पाटील, परिसेविका
कोरोना काळात फ्रंटवर काम करणाऱ्यांना देण्यात येणारी लस ही आपल्या संरक्षणासाठी आहे. प्रथम आरोग्य कर्मचारी सुरक्षित असतील तर ते रुग्णांची सेवा करू शकतील. लोकांच्या मनात असलेली कोरोनाबाबतची भीती दूर करण्यास मदत करतील.
- नम्रता नाईक, परिसेविका
कोविड लसीकरण हे इतर लसीकरणापेक्षा वेगळे आहे. त्यामुळे फ्रंटवर काम करणाऱ्यांनी लसीकरण करणे गरजेचे आहे. कोविड-१९ या जागतिक साथीला आळा घालण्यासाठी हे लसीकरण महत्त्वाचे असून लोकांना संरक्षण मिळणार आहे. सध्या होरपळून निघालेले जगही आनंदाचा श्वास घेणार आहे.
- उषा पाटील, परिसेविका
कोरोनाला हरविण्यासाठी देण्यात येणारी लस प्रथम आरोग्य कर्मचारी व हेल्थ वर्कर यांना देण्यात येणार असल्याचे सरकारचे धोरण अतिशय चांगले आहे. आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी देण्यात येणारी ही लस आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असून मी स्वत: ही लस घेऊन इतरांनाही या लसीचे महत्त्व पटवून देईन.
- छाया कांबळे, परिसेविका
आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी लस घेण्यास मला कोणतीच हरकत नाही. कारण याचे होणारे फायदे हे भरपूर आहेत. तरी या लसीबाबत माझा पूर्ण पाठिंबा आहे.
- सुजाता धारप,
परिसेविका, सर्जिकल वाॅर्ड
सध्या जगात कोविड-१९ या आजाराने धुमाकूळ घातलेला असताना बऱ्याच देशांनी कोरोनाला हरविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून लस तयार केली आहे. त्यामुळे पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी खबरदारी म्हणून ही लस टोचून घेण्यास मी तयार आहे.
- गीता भऊड, परिसेविका
कोविड-१९ पेनडॅमिक सुरू झाल्यापासून सर्व जण घाबरलेल्या अवस्थेत होते. कारण या आजारासाठी कोणत्याही प्रकारची लस उपलब्ध नव्हती. त्यामुळे नागरिक अजूनच भयभीत झाले होते. लस कधी येणार? याची वाट पाहत होते. मात्र आता लसीची प्रतीक्षा संपली आहे. लस येताच मी स्वत: ती टोचून घेऊन इतरांनाही त्याचे महत्त्व पटवून देणार आहे.
- सुविधा दवटे, परिचारिका
येणारी लस आम्ही हायरीस्कमध्ये काम करतो म्हणून प्रथम आम्ही घेणे फायद्याचेच होईल. तर दुसरीकडे नागरिक ही लस टोचून घेण्यास खऱ्या अर्थाने समोर येतील. एखादी लस म्हटली की त्याचे फायदे-तोटे असताताच. मात्र आपण ते सकारात्मकतेने घेतले की सारे काही चांगलेच होते.
- सुजाता पाटील, परिसेविका
मी स्वत: कोविड-१९ विभागात काम करीत असताना कोरोनाबाधित रुग्णांना होणारा त्रास जवळून पाहिला आहे. काही जणांचे आमच्या समोर प्राणही गेले आहेत. त्यामुळे पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी लस टोचून घेणे हिताचे राहील.
- संजाली कुलकर्णी, परिसेविका
आजपर्यंत आलेल्या लसींमुळे भारतातून बऱ्याच आजारांचे उच्चाटन होण्यास मदत झाली आहे. या लसीची संकल्पना क्लीयर झालेली नाही. परंतु नाॅर्मल साईड इफेक्ट सोडता ही लस नक्कीच काम करेल.
- नेहा चव्हाण, परिचारिका
कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी अथक प्रयत्न करून लस तयार करण्यात आली आहे. ही लस सकारात्मक दृष्टीने घेऊन ती टोचून घेणे गरजेचे आहे. लस घेतल्यास त्याचा फायदा नक्कीच होणार आहे.
- कामिनी पाटील, परिसेविका