निरोगी जीवनासाठी आयुर्वेद चिकित्सा गरजेची - श्रीपाद नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 04:04 AM2018-08-26T04:04:34+5:302018-08-26T04:05:21+5:30
सुधागड येथे कार्यक्रम : केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन
राबगाव/पाली : महर्षी चरकमुनींनी चरक संहितेची स्थापना केली आहे. आयुर्वेद हे प्राचीनतम शास्त्र असूनही आजच्या युगातही या शास्त्राच्या सिद्धान्तांवर आधारित चिकित्सा उपयुक्त व यशस्वी ठरते. आयुर्वेदात मुख्यत: वनस्पती व त्यांचे वेगवेगळे भाग, कंदमुळे यांच्यापासून तयार झालेली औषधे वापरतात. निरोगी जीवन जगण्यासाठी मूळ आयुर्वेद चिकित्सा आपण अंगीकारली पाहिजेत, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
सुधागड तालुक्यात जांभूळपाडा सारख्या ग्रामीण भागात महेश अभ्यंकर यांनी आयुर्वेदिक उत्पादन करण्याचे धाडस केले हे कौतुकास्पद असून यापुढील लागणारे सहकार्य शासनाच्या वतीने केले जाईल, असे आश्वासन देऊन नवीन कंपनीच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जांभूळपाडा येथे कंपनीचे उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते झाले.सोहळ्यासाठी आमदार धैर्यशील पाटील, कार्ला येथील आत्मसंतुलन संस्थेच्या सीईओ निरादा गौमन, वरसई सुप्रसिद्ध अनतानंद औषधालयचे संस्थापक विनय भावे यांच्या पत्नी विद्या भावे, वैद्य सुधीर रानडे, वैद्यराज भाऊ सुळे, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल, सुधागड पंचायत समितीच्या सभापती साक्षी दिघे, सरपंच श्रद्धा कानडे, उपसरपंच राजेश शिंगाड आदी उपस्थित होते.
नाईक म्हणाले, आयुर्वेदाची पद्धतीचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आयुष मंत्रालयाची स्वतंत्र स्थापना करून शासनाने ही प्राचीन परंपरा अबाधित राखली. गेल्या चार वर्षांत आयुष मंत्रालय तर्फे झालेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. १२ राष्ट्रांमध्ये आपली एमओव्ही झाली असून आयुर्वेदात तथ्य आहे म्हणून यांचे संशोधक भारताबरोबर संशोधनासाठी काम करत आहे. परदेशातील दहा विद्यापीठांमध्ये भारतीय प्राध्यापक आयुर्वेद पद्धती शिकविण्यासाठी जात आहेत.
भारतात दोन वर्षांपूर्वी कॅन्सर आजारावर कॉन्फरन्स घेतली होती त्यात अमेरिकेतील १५ डॉक्टरांची टीम आली होती. प्रत्येक राज्यात एक आयुर्वेद संस्था आणि प्रत्येक जिल्ह्यात आयुर्वेद चिकित्सालय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून १०० ठिकाणी याच्या मान्यता देऊन काम सुरू झाल्याची माहिती नाईक यांनी दिली.