दीड कोटींच्या दरोडा प्रकरणाची सुनावणी
By admin | Published: April 17, 2016 01:18 AM2016-04-17T01:18:08+5:302016-04-17T01:18:08+5:30
पाली येथे सोन्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याकडून दीड कोटी रकमेचा दरोडा टाकून लुटण्यात आलेल्या बहुचर्चित दरोडा प्रकरणाची सुनावणी येथील जिल्हा न्यायालयात लवकरच सुरू होणार
अलिबाग : पाली येथे सोन्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याकडून दीड कोटी रकमेचा दरोडा टाकून लुटण्यात आलेल्या बहुचर्चित दरोडा प्रकरणाची सुनावणी येथील जिल्हा न्यायालयात लवकरच सुरू होणार असून, या खटल्याप्रकरणी विशेष शासकीय अभियोक्ता म्हणून सरकारतर्फे अॅड. विलास नाईक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
रायगड पोलिसांना १० आरोपी अटक करण्यात यश आले आहे. पाली येथील ज्वेलर्स रमेश भिकमचंद परमार यांनी या दरोड्याची तक्रार पाली पोलीस स्टेशन येथे दिली होती. त्यामध्ये विनोद गुडेकर, भगवान महाडीक, दिनेश, नीलेश महाडीक, संतोष महाडीक, दीपक महाडीक, हरिश्चंद्र गुडेकर, आदित्य भुजबळ, स्वप्नील आरणे व अजित शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. काही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्यात वापरलेली मारु ती सुझुकी कार, यामाहा मोटारसायकल, एक एअरगन व काही हत्यारे जप्त करण्यात आली असल्याची माहिती अॅड. विलास नाईक यांनी दिली.
बनावट दरोडा पडल्याचे दाखवून, १ कोटी ३४ लाखांची रोकड लंपास करण्याचा गुन्हा गेल्या १५ मार्च रोजी पायरीची वाडी येथे हरीराम दळवी यांच्या फार्महाऊसवर घडला होता. तक्रारदार व अन्य व्यापारी साक्षीदार यांना स्वस्त दरात सोने देतो असे सांगून त्यांना फार्महाऊसवर सोने खरेदीसाठी बोलवायचे व खोटे सोने दाखवून पैसे ताब्यात घेतल्यावर कटकारस्थान करून सशस्त्र दरोडा पडला असे दाखवून लुटायचे, असा बेत आरोपींनी संगनमताने आखला होता. त्याप्रमाणे साक्षीदार फार्महाऊसवर आल्यावर त्यांना माराहाण करून त्यांच्या गाड्यांच्या चाव्या व मोबाइल फोन काढून घेऊन १ कोटी ३४ लाखांचा धाडसी दरोडा टाकण्यात आला होता.
याबद्दलची फिर्याद नोंदविल्यावर पाली पोलीस स्टेशनचे तपासी अंमलदार अशोक विठ्ठल पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक्क यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने आरोपींना पकडून त्यांच्याकडून दरोड्यातील रक्कम, लपवलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले. विशेष म्हणजेच कोट्यवधी रु पयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)