नवी मुंबई : सांगली येथे राहणारे ५६ वर्षीय दादासाहेब पाटील यांची हृदयाची रक्ताभिसरणाची क्षमता कमी असल्याने १९ सप्टेंबर रोजी नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात केलेली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. हृदय प्रत्यारोपणाकरिता तयार केलेल्या ‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे मुंबईतील लोअर परळ ते नवी मुंबईतील रुग्णालय हे ४५ किलोमीटरचे अंतर पार पाडण्यात रुग्णालयाच्या पथकाला अवघा २५ मिनिटांचा कालावधी लागला असून, या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला नवीन आयुष्य मिळाले आहे.
सांगली जिल्ह्यातील पाटील हे ८ महिन्यांपूर्वी बायपास शस्त्रक्रियेसाठी अपोलो रुग्णालयात आले होते. तपासणीदरम्यान त्यांच्या हृदयाचे कार्य केवळ २५ टक्के इतकेच सुरू असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले, परंतु त्या काळात कोविड परिस्थितीमुळे शस्त्रक्रिया होऊ शकली नाही आणि त्यांना परत आपल्या गावी जावे लागले. पुढच्या काही महिन्यांत हृदयक्रिया बंद पडण्याच्या स्थितीत होते. नवीन हृदय बसविणे हाच एकमेव मार्ग होता. मुंबईतील मृत्यू झालेल्या एका ३१ वर्षीय तरुणाच्या हृदयदानाबाबत माहिती मिळताच, रुग्णालयाच्या माध्यमातून ग्रीन कॉरिडॉर तातडीने कार्यान्वित करण्यात आला. हृदयदान करणाऱ्या तरुणाचे हृदय काढून घेण्यात आले व ते अपोलो रुग्णालयामध्ये आणून हृदय व फुप्फुस प्रत्यारोपणाचे सर्जन डॉ.संजीव जाधव यांच्या नेतृत्वाखालील अपोलोच्या विशेष तज्ज्ञांच्या पथकाने यशस्वी प्रत्यारोपण केले. हृदय प्रत्यारोपणाची ही साधारण ९० मिनिटे सुरू असलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, रुग्ण व्यवस्थितरीत्या बरा झाला आहे. हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांचे प्रमाण देशात वाढत असल्याने, प्रतिबंधात्मक उपाय, त्वरित निदान आणि उपचार करू शकण्याच्या मजबूत यंत्रणेची आवश्यकता असल्याचे रुग्णालयाचे सीओओ आणि युनिट प्रमुख संतोष मराठे यांनी सांगितले.रुग्ण बरा झाल्याचा आनंदहृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया समाधानकारक झाली व रुग्ण बरा झाल्याचा आनंद वाटत असल्याचे डॉ.संजीव जाधव यांनी सांगितले.