कर्जत : नेरळ गावातील हाजी लियाकत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय साहिल ठोंबरेचा रेल्वे रूळ ओलांडताना झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. क्रिकेट खेळण्यासाठी रेल्वे मार्ग ओलांडताना मुंबईकडून कर्जतकडे जाणाऱ्या गाडीने त्याला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला.नेरळ पाडा भागातील ओंमकार सदनमधील रहिवासी संभाजी ठोंबरे यांचा मुलगा साहिल यंदा दहावीला होता. नेरळ - कर्जत राज्यमार्ग असलेल्या हाजी लियाकत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या साहिलला परीक्षेत ५१ टक्के गुण मिळाले होते. मात्र, आपण दहावीची परीक्षा पास होणार, अशी खात्री असल्याने साहिलने एक महिन्यापूर्वीच अकरावीचे ट्यूशनला जाणे सुरू केले होते. शुक्रवारी दुपारी दहावीचा ऑनलाइन निकाल लागल्यावर ५१ टक्के गुण मिळाल्याने साहिल काहीसा नाराज होता. मात्र, शाळेचा निकाल १०० टक्के लागल्याने तो आनंदी होता. दिवसभर घरीच असलेला साहिल सव्वाचारच्या सुमारास क्रिकेट खेळण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र, रेल्वे मार्ग ओलांडताना मुंबई येथून कर्जतकडे जाणाऱ्या लोेकलची धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हृदयद्रावक! क्रिकेट खेळण्याची घाई बेतली जीवावर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 8:49 AM