दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे राखले भान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 01:45 AM2020-08-24T01:45:37+5:302020-08-24T01:45:48+5:30
रायगडमध्ये सार्वजनिक १५ तर २५ हजार ४२५ घरगुती गणेशमुर्तींचे विसर्जन
अलिबाग : ‘गणपती बाप्पा मोरया या पुढच्या वर्षी लवकर या...’ जयघोषांसह रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी रविवारी दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन झाले. शनिवारी जिल्हाभरात गणरायाचे घरोघरी आगमन झाले होते. मात्र, अनेकांच्या घरी परंपरेनुसार दीड दिवसांतच बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. दुपारी तीननंतर सहकुटुंब विसर्जनाला सुरुवात झाली. यावेळी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.
गणरायांची चतुर्थीच्या मुहूर्तावर स्थापना करण्यात आली होती. रविवारी दुपारी तीननंतर अनेकांनी विसर्जनाची तयारी केली. त्यानंतर, विधिवत पूजा, आरती करून व नैवेद्य दाखवून तलावावर व नदीच्या ठिकाणी विसर्जन केले गेले. सार्वजनिक १५ तर २५ हजार ४२५ घरगुती गणपतींना निरोप देण्यात आला.
सुरक्षारक्षक बाप्पांचे विसर्जन करीत होते. जिल्ह्यातील विसर्जन घाटावर सामाजिक अंतराचे पालन करताना नागरिक दिसत होते. त्यामुळे सुमद्रकिनाऱ्यावर शांतता होती, तसेच विसर्जनासाठी आलेल्या भक्तांना प्रवेशद्वारावरचसूचना नगरपालिकेच्या वतीने देण्यात येत होत्या.
जिल्ह्यात गणेश विसर्जनाच्या निमित्ताने फुलणारे सर्व समुद्रकिनारे सुनेसुने झाले होते, तसेच जिल्ह्यातील विसर्जन घाटांवर नियमांचे पालन व्हावे, म्हणून सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विसर्जन मिरवणुकांच्या निमित्ताने कुठेही अनुचित प्रकाराची नोंद झाली नसल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाच्या सूत्रांनी दिली.गणोशोत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
माणगाव तालुक्यात साध्या पद्धतीने २,४५० बाप्पांना निरोप
‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...’ या जयघोषांसह माणगाव शहरात व तालुक्यात रविवारी दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन झाले. माणगाव तालुक्यात सुमारे २,४५० बाप्पांचे विसर्जन करण्यात आले, पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जन साध्या पद्धतीने केले.
दुपारी चारनंतर सहकुटुंब विसर्जनाला सुरुवात झाली. यावेळी कुटुंबीयांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. गणरायांची चतुर्थीच्या मुहूर्तावर स्थापना करण्यात आली होती. रविवारी दुपारी तीननंतर अनेकांनी विसर्जनाची तयारी केली. त्यानंतर, श्रीगणेशाची विधिवत पूजा, आरती करून व नैवेद्य दाखवून काही ठिकाणी तलावात तर बºयाच ठिकाणी नदीच्या ठिकाणी विसर्जनास सुरुवात केली. स्थानिक प्रशासनाने नियमबद्ध नियोजन केल्याचे दिसून आले.
पनवेलमध्ये तलावांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त
सुरू झालेल्या गणेशोत्सवात रविवारी दीड दिवसांच्या बाप्पाला पनवेल पालिका क्षेत्रात भावपूर्ण निरोप देण्यात आले. पालिकेने याकरिता ठिकठिकाणी कृत्रिम तलाव उभारले होते. कोविडच्या सावटामुळे या वर्षी ५४ सार्वजनिक गणपती मंडळ, ३७ सोसायटीतील मंडळांनी व ५,९२४ घरगुती व्यक्तींनी १० दिवसांऐवजी दीड दिवसांच्या गणपतीचे आयोजन केल्याने, या वर्षी विसर्जन घाटांवर मोठी गर्दी झाली होती. पालिका व पोलीस प्रशासनाने विसर्जन घाटांवर चोख बंदोबस्त ठेवले होते. पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी विसर्जन घाटांवर भेट देत आढावा घेतला. या वर्षी मिरवणुकीवर बंदी असल्याने शांततेतच बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. नागरिकांनी पालिकेला उत्तम सहकार्य केले. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी प्रत्येक विसर्जन घाटावर बंदोबत ठेवले होते. पालिका हद्दीत चार विभागांत एकूण ४१ विसर्जन घाट बांधले होते.
उरणमध्ये गणपतींना शांततेत निरोप
उरणमध्ये घरगुती १,५०० तर सार्वजनिक १३ गणपतींचे विसर्जन करण्यात आले. तालुक्यातील ठिकठिकाणी नागरिकांनी नियमांचे पालन करीत शांततेत विसर्जन केल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांनी दिली. उरण तालुक्यातील मोरा, घारापुरी, भवरा तलाव, विमला तलाव, खाड्या, पीरवाडी, माणकेश्वर, दांडा, करंजा आदी समुद्रात दीड दिवसांच्या १,५०० घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले, तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी दीड दिवसांचा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, रविवारी, १३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने दीड दिवसांतच गणपतींचे विसर्जन केले. यामध्ये १३ सार्वजनिक, १,१०० घरगुती गणपतींचा समावेश होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत विसर्जन झाल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांनी दिली.