विनोद भोईर
पाली : यंदा पावसाळा लांबल्याने सुधागड तालुक्यात कलिंगडाची लागवड उशिरा झाली. त्यामुळे कलिंगड बाजारपेठेत उशिरा दाखल झाले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ ते ३० टक्क्यांनी दरात वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातच वाढत्या उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे थंडाव्यासाठी तालुक्यातील नागरिक कलिंगड व काकडीला पसंती देत आहेत. त्यामुळे कलिंगड व काकडीचे दर कडाडले आहेत. या वर्षी पावसाळा लांबल्याने व अवकाळी पाऊस पडल्याने कलिंगडाची लागवड खूप उशिराने करण्यात आली. काहींनी तर या फळशेतीकडे पाठ फिरवली. त्यामुळे त्यांचे क्षेत्र घटले आणि त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे. गेल्या वर्षी आठ हजार रुपये टन या दराने मिळणारे कलिंगड तब्बल ११ हजार ते १२ हजार रुपये टन दराने विकण्यात येत आहे. किरकोळ बाजारातही त्यांचे दर कडाडले आहेत. किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपयांना मिळणारे मध्यम आकाराचे कलिंगड आता ८० ते ९० रुपयांना विकण्यात येत आहे. ७० ते ८० रुपये किलो दराने काकडी विकण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत काकडीचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना फटका बसला असून सततच्या आभाळामुळे व वातावरणातील बदलामुळे ऐन हिवाळ्यात वाढत्या उन्हाचे चटके जाणवत आहेत. त्यामुळे नागरिक उन्हाच्या काहिलीपासून बचावासाठी कलिंगड, काकडी या थंड फळांवर ताव मारत आहेत.अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. खराब हवामानाचा फटका कडधान्य, कलिंगड आणि इतर पिकांना बसला आहे. सरकारच्या कर्जमाफीबद्दल अजूनही साशंकता आहे. या सर्वांमुळे शेतकरी भरडला गेला आहे.- शरद गोळे, सचिव,सुधागड कृषिमित्र संघटना पालीयंदा कलिंगडाचे उत्पादन खूप कमी झाले आहे. त्यामुळे घाऊक किमतीत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारातही दरात वाढ झाली आहे. तरीदेखील खवय्ये आवर्जून कलिंगड खरेदी करत आहेत.- उमेश मढवी, कलिंगड विक्रे ते, पाली