आविष्कार देसाई अलिबाग : गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झाला असून, हळूहळू उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे वातावरणामध्ये गरमी वाढल्याची अनुभूती येत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पारा ४२ अंशावर पोचल्याने येणाºया कालावधीत उन्हाचा तडाखा चांगलाच बसणार असल्याचे संकेत निसर्गाने दिले आहेत. येत्या ४८ तासांमध्ये रायगड, ठाणे, ग्रेटर मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा भारतीय हवामान खात्याचा अहवालवजा इशारा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे वातावरण आणखीनच तापले आहे.भारतीय हवामान खात्याने २८ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या अहवालामध्ये हवामानात बदल होऊन तापमानात कमालीची वाढ होऊन येत्या ४८ तासांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा अहवाल वजा इशारा जिल्ह्यातील प्रमुख विभाग, विविध कंपन्या यांना दिला. त्या अहवालाची प्रत दुपारनंतर सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घालत होती. या अहवालाच्या सत्यतेबाबत रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख सागर पाठक यांच्याकडे विचारणा केली, असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांमध्ये रायगड, ठाणे, ग्रेटर मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार आहे. त्यामुळे दुपारच्या कालावधीत कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, तसेच उन्हापासून संरक्षण होणाºया साधनांचा वापर करावा, भरपूर पाणी पिण्याची गरज आहे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत थंडीचा कडाका अनुभवता येत होता. त्यामुळे थंडीचा मुक्काम अजून काही दिवस तरी लांबणार असे दिसत होते. मात्र, अचानक मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वातावरणात उष्णता वाढल्याचे जाणवू लागले. गेल्या २४ तासांतील तापमानाची नोंद घेतली असता ती तब्बल ४२ अंश सेल्सियस एवढी आढळली आहे. त्यामुळे आगामी कालावधीत उन्हाचा तडाखा हा चांगलाच बसणार असल्याचे संकेत आधीच दिले आहेत.गेल्या वर्षी रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाेच्च ४७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती, अशी माहिती पाठक यांनी दिली. आगामी कालावधीत गरमी वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.-भिरा येथील टाटा पॉवर हाऊसच्या परिसरामध्ये हवामान विभागाचे हवामान केंद्र आहे. त्या ठिकाणी दैनंदिन तापमानाची नोंद घेतली जाते.-हवामान खात्याने उत्तर कोकण, दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व आणि पश्चिम वर्धा विभागाच्या संबंधित अधिका-यांना अहवाल वजा इशारा जारी केला आहे. तसेच याबाबतची नोंद घ्यावी असे एक प्रकारे सूचित केल्याचे दिसून येते.-सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अहवालामुळे भीती आणि घबराट पसरवणाºया अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे; परंतु कोणीही पॅनिक होण्याची गरज नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे. तसेच कृपया अफवा पसरवू नका आणि त्या अफवांनाही बळी पडू नका असे, आवाहन करण्यात आले आहे.
रायगड, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेची लाट ; मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पारा ४२ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 2:37 AM