हेटवणे कालव्याला पाणी सोडले
By Admin | Published: December 31, 2016 04:20 AM2016-12-31T04:20:22+5:302016-12-31T04:20:22+5:30
तालुक्याला वरदान ठरलेले हेटवणे मध्यम प्रकल्पाचे रब्बी हंगामासाठी कालव्यात २६ डिसेंबरपासून पाणी सोडण्यास प्रारंभ केला आहे. तब्बल ६ हजार ६६८ हेक्टर क्षेत्रावर सिंचन
पेण : तालुक्याला वरदान ठरलेले हेटवणे मध्यम प्रकल्पाचे रब्बी हंगामासाठी कालव्यात २६ डिसेंबरपासून पाणी सोडण्यास प्रारंभ केला आहे. तब्बल ६ हजार ६६८ हेक्टर क्षेत्रावर सिंचन निर्मितीसाठी असलेले सात दशलक्ष घनमीटर राखीव पाण्यातून सध्या १८०० हेक्टर क्षेत्रावरच सिंचन क्षमता उपलब्ध आहे. हेटवणे उजवा व डावा कालवा अशा १९ किमीच्या टप्प्यात कालव्याला पाणी सोडल्याने येत्या नववर्षाच्या प्रारंभीच रब्बी हंगामाच्या अनुषंगाने शिवारात शेतकरी व मजुरांची रेलचेल वाढणार आहे.
२०१६ या सरत्या वर्षाला निरोप देताना, नव्या वर्षाच्या २०१७ च्या पुढील चार महिन्यांच्या रब्बी हंगामाची तयारी यापूर्वीच शेतकरी बांधवांनी केली आहे. नोटाबंदीने ग्रामीण जीवनात उडालेली खळबळ व कॅशलेस व्यवहाराचा सुरू झालेला बोलबाला याकडे दुर्लक्ष करीत बळीराजा आता रब्बीच्या मोसमाची तयारीत गुंतला आहे. सध्या पाच दिवस सोडण्यात आलेल्या सिंचनाच्या पाण्याने शेतजमीन पूर्णपणे भिजलेली नाही. १८ हेक्टर क्षेत्र पूर्णपणे ओलेचिंब होण्यासाठी नववर्षाचा पहिला आठवडा जाणार आहे. हेटवणे कालव्याची देखाभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे लक्ष नाही. अनेक ठिकाणी कालव्याला गळती लागली आहे. मात्र सध्या शेतकऱ्यांसाठी पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. सध्या पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने कालव्यातील कचरा पाण्याच्या पृष्ठभागावरून वाहतो आहे. हवेत गारठा व पारा खाली असल्याने हेटवण्याच्या प्रवाहाने तो अधिकच खाली गेला आहे.
नववर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात २० ते २२ जानेवारी २०१७ पासून रब्बीच्या भातशेती लावणी हंगामास प्रारंभ होणार आहे. सध्या भिजलेल्या भाताच्या वाफ्यामध्ये बीजरोपण तथा पेरणी प्रक्रिया सुरू आहे. यावर्षी पेण तालुक्यात ४ हजार ३०० मिमी एकूण पावसाची झालेली नोंद झाल्याने रब्बी हंगामात कालव्याला मुबलक पाणी सोडण्यात हेटवणे प्रकल्प संस्थेला अडचण भासणार नाही. एकूण रब्बी हंगामास अनुकूल वातावरण निर्मिती व शंभर टक्के उत्पादनाची ठोस हमी असल्यामुळे रब्बीचा हंगाम शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. (वार्ताहर)