महाडमधील रोहन केमिकल्समध्ये भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 03:07 PM2018-05-24T15:07:05+5:302018-05-24T15:07:05+5:30
महाड औद्योगिक वसाहतीमधील रोहन केमिकल्स या कारखान्याला आज भीषण आग लागली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीमध्ये कारखान्यातील यंत्रसामुग्री आणि मालमत्ता मोठ्या प्रमाणावर भस्मसात झाली.
- संदीप जाधव
रायगड: महाड औद्योगिक वसाहतीमधील रोहन केमिकल्स या कारखान्याला आज भीषण आग लागली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीमध्ये कारखान्यातील यंत्रसामुग्री आणि मालमत्ता मोठ्या प्रमाणावर भस्मसात झाली. आगीचे निश्चित कारण समजलेले नाही. गेल्या महिनाभराच्या काळात महाड औद्योगिक वसाहतीमध्ये घडलेली आगीची ही दुसरी मोठी घटना आहे.
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेत पाणी आणि फोमचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. सुमारे तीन चार तासांच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले. महाड नगरपालिकेचे बंब देखील घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत कारखान्यातील यंत्रसामुग्री आणि मालमत्ता मोठ्या प्रमाणावर स्वाहा झाली होती. आग या कारखान्याबाहेर पसरू नये म्हणून महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या एल अँड टी या कंपनीने कारखान्याबाहेर मातीचे डंपर ओतून आवश्यक ती दक्षता घेतली.
आगीमध्ये या कारखान्यातील रसायनाने देखील पेट घेतल्याने त्या वायूमुळे अग्निशमन कर्मचारी त्याचप्रमाणे घटनास्थळी उपस्थित पोलीस आणि नागरिकांना डोळे चुरचुरणे, डोळ्यांतून पाणी येणे, श्वास घ्यायला त्रास होणे अशा त्रासांना सामोरे जावे लागले. या कारखान्यालगतच जीते हे गाव आहे. या गावांतील नागरिकांमध्येही भीती आणि दहशतीचे वातावरण पहावयास मिळाले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे स. पो. निरीक्षक आबासाहेब पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. आग निश्चित कशामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही. मात्र शेजारच्या कारखान्यातून उडालेल्या ठिणगीने ही आग लागल्याचा दावा केला जात होता. मात्र त्याला दुजोरा मिळालेला नाही.