अलिबाग : रायगड जिल्हयाच्या अनेक भागात आज संध्याकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. महाड , पोलादपूर , माणगाव, म्हसळा, रोहा, श्रीवर्धन, तळा, पेण, अलिबाग या तालुक्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. ढगांचा गडगडाट आणि वीजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला. त्यामुळे उकाड्ने हैराण नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. सर्वत्र दाट ढग आल्यामुळे भरदिवसा काळोख पसरला होता. सायंकाळच्या सुमारास लागलेल्या पावसाने रायगडकराना चांगलेच झोडपून काढले.
रायगड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. गणेशोत्सव काळात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. मात्र गौरी गणपतीचे विसर्जन हे पावसाविना झाले होते. पावसाने दडी मारल्याने वातावरणात उष्णता निर्माण झाली होती. त्यामुळे उकाड्याने रायगडकर हैराण झाले होते. पाऊस नसल्याने भातपीक ही धोक्यात आले होते. भातरोपे ही आता पिकू लागल्याने पाण्याची गरज आहे. पावसाने दडी मारल्याने पिकेही सुकू लागली होती. त्यामुळे शेतकऱ्याचे डोळेही आकाशाकडे लागले होते.
बुधवारी दुपारनंतर वातावरण ढगाळ झाले होते. त्यामुळे अंधार होऊन पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. सायंकाळच्या सुमारास पावसाचे जोरदार आगमन झाल्याने रस्ते पुन्हा पावसाच्या पाण्याने न्हाऊन गेले. वातावरणातही गारवा निर्माण झाला. जिल्ह्यातील दक्षिण भागात पावसाचा जोर वाढला होता. पावसासह विजांचा आणि ढगांचाही गडगडटाचा खेळ सुरू होता. पाऊस सुरू झाल्याने शेतकरी राजाही सुखावला आहे. अचानक सुरू झालेल्या पावसाने नागरिकांचे तसेच गणेश मंडळाची धावपळ झाली.