मुसळधार पाऊस, धुके आणि दुर्गंधी; दुर्घटनेतील मृतांची संख्या २२ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 09:57 AM2023-07-22T09:57:37+5:302023-07-22T09:57:51+5:30
इर्शाळवाडीत शोधमोहिमेत अडचणींचा डोंगर; मृतांची संख्या २२ वर
लोकमत न्यूज नेटवर्क
इर्शाळवाडी/अलिबाग : खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्यानंतर झालेल्या दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी एनडीआरएफच्या बचाव पथकाला शुक्रवारी सहा मृतदेह काढण्यात यश आले. मृतांचा आकडा २२ वर पोहोचला आहे. खालापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे, सोबतच धुके असल्याने बचाव व शोधमोहिमेला अडचणी येत आहेत. दुर्गंधीही येत आहे. अजूनही १७ घरे ढिगाऱ्याखाली आहेत.
माणसे आणि मुक्या प्राण्यांना वाचविण्यासाठी बचाव पथकाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कोणतीही मोठी साधनसामग्री घटनास्थळावर पोहोचू शकत नसल्याने ढिगारा उपसण्याचे मोठे आव्हान बचाव पथकासमोर आहे. परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सरकारी यंत्रणेसोबत सामाजिक संस्थाही मदतकार्यात सहभागी होऊन काम करीत आहेत.
इर्शाळवाडी गावावर बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दरड कोसळली. त्यानंतर तातडीने खालापूरचे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. सकाळी साडेचारपर्यंत एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर शोध व बचाव मोहिमेला गती आली. गुरुवारी सायंकाळपर्यंत १६ मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले होते.
शुक्रवारी आणखी सहा मृतदेह शोधण्यात यश
पावसामुळे चिखल झाला असल्याने घराचा एक-एक भाग शोधला जात आहे. सकाळी दहा वाजता एक मृतदेह सापडला. त्यानंतर दिवसभरात सहा मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात आले. कोणी व्यक्ती ढिगाऱ्याखाली जिवंत आहे का, याचा शोध एनडीआरएफचे पथक घेत आहेत.
मृतांची नावे
n रवींद्र पदू वाघ (वय ४६)
n कमल मधू भुतांब्रा (वय ४५)
n कान्ही रवी वाघ (वय ४५)
n हासी पांडुरंग पारधी (वय ५०)
n मधू नामा भुतांब्रा (वय ५५)
n पांडुरंग धावू पारधी (वय ५५)
दरडग्रस्त कुटुंबांना मदतीचा ओघ सुरू
खालापूरचे प्रांत, तहसीलदार, नायब तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक तसेच रिलायन्स, टाटा कंपन्याचे मनुष्यबळ, इमेजिका, खोपोली नगरपालिका आदींचे पथक घटनास्थळी आहेत.
सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, लायन्स क्लब (खोपोली) आणि अन्य संस्थांकडून दरडग्रस्त कुटुंबांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. विविध जीवन उपयोगी वस्तू पीडित कुटुंबांना देण्यात येत आहेत.