अलिबाग - रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. रात्रीपासूनच जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. जिल्ह्यातील सावित्री आणि पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर कुंडलिका, अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. रात्रभर पडत असलेल्या पावसाने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. जिल्ह्याला २१ जुलै पर्यंत अतिवृष्टीचा धोका हवामान विभागाने दिला आहे. जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थिती अनुषंगाने सर्व यंत्रणा प्रशासनाने सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात रात्री पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आंबेनळी घाटात रात्री दरड कोसळली असल्याने हा रस्ता बंद करण्यात आला आहे. पोलादपूर, महाड तसेच महाबळेश्वर येथे मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पोलादपूर रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. सावित्री नदिनेही धोक्याची पातळी ओलांडली असल्याने महाड मध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाड मध्ये एन डी आर एफ पथक दोन दिवसापासून हजर आहे.
अलिबागमध्येही बायपास येथे मुसळधार पावसाने पाणी साचले आहे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी, पालकांचे तसेच प्रवाशाचे हाल झाले आहेत. मिळकतखार मळा येथील नदीही तुंबडी भरून वाहत असल्याने गावात पाणी शिरले आहे. जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. IMD मुंबई यांनी पुढील 48 तासात रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुरप्रवण आणि दरडग्रस्त गावांनी सतर्क राहवे.
DM CELL रायगड संपर्क - ०२१४१ २२२०९७ २२२११८