रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 04:13 AM2018-06-11T04:13:49+5:302018-06-11T04:13:49+5:30
रायगड जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यांना पावसाने सर्वाधिक झोडपून काढले. त्यामध्ये प्रामुख्याने अलिबाग, मुरुड, उरण, श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्याचा समावेश आहे.
अलिबाग - जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यांना पावसाने सर्वाधिक झोडपून काढले. त्यामध्ये प्रामुख्याने अलिबाग, मुरुड, उरण, श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्याचा समावेश आहे. मागील २४ तासांत तब्बल एक हजार ११२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत २४२ मिलीमीटर पाऊस अधिक पडला आहे. अलिबाग-कार्लेखिंड आणि मुरुड-बोर्ली येथे झाडे पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. आगामी ४८ तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
भारतीय हवामान विभाग आणि स्कायनेट यांनी ९ ते १२ जून या कालावधीत २६ जुलै २००५ एवढा पाऊस पडणार असल्याचा इशारा आधीच दिला आहे. शुक्रवारची रात्र आणि शनिवारचा अखंड दिवस जणू वरुणराजाच्याच नावावर दिला होता. सोसाट्यांच्या वाºयांसह त्यांनी न थकता बरसण्यास सुरुवात केल्याने सर्वांचीच चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने नगर पालिका, ग्रामपंचायतीने नालेसफाईचे केलेले दावे पावसाने खोटे ठरवले. पावसाचा जोर प्रचंड असल्याने नाले दुथडी भरून वाहत होते. दरम्यानच्या कालावधीत समुद्राला भरती आल्याने त्याच नाल्यांच्या माध्यमातून पाणी सखल भागात साठल्याचे दिसून आले.
वृक्ष कोसळल्याने वाहतूक ठप्प
पावसाला सोसाट्याच्या वाºयाची सोबत असल्याने अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंड आणि मुरुड तालुक्यातील बोर्ली-मांडला परिसरामध्ये मोठे झाड रस्त्यामध्येच पडले. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली.
पावसाचा आनंद घेण्यासाठी अलिबाग आणि मुरुड तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. रस्त्यामध्ये झाड पडल्याने त्यांना वाटेतच अडकून पडावे लागले. संबंधित यंत्रणेने रस्त्यातील झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.
बचाव पथकांना दक्षतेच्या सूचना
पुढील ४८ तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, कामाशिवाय बाहेर पडू नये, समुद्र किनारी भागात राहणाºया नागरिकांनी दक्ष राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
समुद्र किनारी येणाºया पर्यटकांना समुद्रामध्ये जाण्यापासून मज्जाव करावा. तेथील संबंधित बचाव पथकाने यावर लक्ष द्यावे. नागरिक आणि पर्यटकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
मुरु ड तालुक्यात ४१४ मि.मी.ची नोंद
आगरदांडा : मुरु ड तालुक्यातील सर्वच भागात गेले दोन दिवस विजांच्या कडकडासह जोरदार पावसाने हजेरी लागल्याने शेतकरी सुखावले आहेत.
आतापर्यंत तालुक्यात ४१४ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. सोसाट्याच्या वाºयामुळे काही ठिकाणी वृक्ष कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. पावसामुळे वीज प्रवाह खंडित झाल्याने नागरिक प्रचंड त्रस्त आहेत.
डोंगराळ भागात दरडींचा धोका
श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यात शनिवारी रात्रीपासून पावसाने चांगलाच जोर धरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील कोलमांडला आडी रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडला आहे. त्यामुळे सदर मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. एसटीच्या सायंकाळपर्यंतच्या नियोजित फेºया बंद करण्यात आल्या आहे. सदर मार्गावर दैनंदिन वाहतूक तुरळक प्रमाणात सुरू आहे. तालुक्यातील श्रीवर्धन शेखाडी मार्गावरील कोंडविल येथे दरड कोसळण्याचा धोका आहे. कारण पावसामुळे डोंगरावरील दगड व माती रस्त्यावर येण्यास सुरूवात झाली आहे.
श्रीवर्धन तालुक्यात अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. डोंगराळ भागात अनधिकृत बांधकामे वाढल्याने दरडी कोसळण्याचा धोका निर्माण होत आहे.