सुधागडात मानखोरे भागात पावसाचा जोर अचानक वाढला; आंबा नदीचे तीनही पूल पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 06:37 PM2021-07-21T18:37:56+5:302021-07-21T18:38:16+5:30
पाली -खोपोली -वाकण महामार्ग वाहतुकीस बंद. रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरु आहे.आज मात्र पावसाने उच्चांक गाठला आहे.
- विनोद भोईर
पाली : सुधागडात आज पावसाने अचानक कहर केल्याने . सुधागडातील आंबा नदीवरील जांभूळपाडा, भेरव,व पाली हे महत्वाचे पूल पाण्याखाली गेले आहेत.तसेच पेडली गावालगत असणाऱ्या नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ होताना दिसत आहे त्यामुळे पेडली गावातील नागरिकांमध्ये देखील भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने तात्काळ ह्या सर्व मार्गांवरील वाहतूक बंद केली असून त्याठिकाणी पोलीस यंत्रणा तैनात केली आहे.नागरिकांना पुराच्या पाण्याच्या जवळ जाण्यास बंदी घातली आहे.
रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरु आहे.आज मात्र पावसाने उच्चांक गाठला आहे.त्यामुळे सुधागडात पाणीच पाणी झाले आहे. सुधागडातील काही सखल भागात पाणी साचले असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी दिल्या आहेत. सुधागडात यावर्षीची पावसाची सर्वाधिक नोंद असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे.जांभूळपाडा याठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन देखील तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहेत.तसेच जांभूळपाड्यातुन माणगाव,मानखोरे याठिकानच्या गावांकडे जाणारा मार्ग देखील तूर्तास बंद करण्यात आला आहे.तालुक्यात कोठे दरडी कोसळणे,भुस्कलन होणे अशा प्रकारच्या घटनांकडे तालुका प्रशासन लक्ष ठेऊन आहे.तसेच कोणीही नागरिकांनी विनाकारण घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.