महादेव भिसेपावसाळी पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या आंबोली घाटामध्ये शुक्रवारी रात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास मुख्य धबधबा पासून अर्धा किलोमीटर पुढे दरड कोसळली. त्यामुळे घाट रस्ता पूर्णपणे वाहतुकीस ठप्प झाला. याबाबत आंबोली पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर आंबोली पोलीस उपनिरीक्षक बाबू तेली व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्री घटनास्थळी जात पाहणी केली. तत्काळ वाहतूक थांबवली यानंतर सकाळी सात वाजताच्या सुमारास आंबोली पूर्वीचा वस येथेसुद्धा भली मोठी दरड कोसळली. त्यामुळे आंबोली घाटात दोन ठिकाणी दरडी कोसळल्याने रस्ता पूर्णपणे वाहतुकीस पूर्णपणे ठप्प झाला.
आंबोली पोलीस प्रशासनाकडून बांधकाम विभागाला वारंवार याबाबत माहिती देण्यात आली होती. परंतु म्हणावा तसा सकारात्मक प्रतिसाद बांधकाम विभागाकडे मिळाला नसल्याचे सांगण्यात आले.आंबोली घाट रस्ता हा नेहमी पावसाळ्यात छोटी मोठी दरड कोसळल्याने बंद पडत असतो. त्या अनुषंगाने सध्याची पर्जन्यवृष्टी पाहता बांधकाम विभागाने कायमस्वरूपी जेसीबी व रस्ता कामगार यांची नेमणूक करणे गरजेचे होते. परंतु तसे न झाल्याने तत्काळ दरडी काढता येणे शक्य असतानाही नाहक प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले आहे. बांधकाम विभागाच्या कुचकामीपणाबद्दल यावेळी तीव्र संताप वाहनचालक तसेच ग्रामस्थांमधून व्यक्त होत होता.