रायगडमध्ये जोरदार पावसाला सुरुवात; राब करपण्याची भीती झाली दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 01:10 AM2020-07-04T01:10:06+5:302020-07-04T01:10:21+5:30
शेतीच्या कामांना वेग : २४ तासांत ३३६ मिमी पाऊस,
रायगड : जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये ३३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाला सुरुवात झाल्याने शेतीच्या कामांना वेग आल्याने बळीराजा चांगलाच सुखावला आहे. काही ठिकाणी भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. ४ जुलै रोजी तुरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर ५, ६ आणि ७ जुलै रोजी रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. तरी त्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात एक लाख पाच हजार हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेतले जाते. पावसाची अनिश्चितता असल्याने बळीराजा चिंतातुर झाला होता. अख्खा जून महिना कोरडा गेला होता. कमी-अधिक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी शेतात राब टाकले होते, परंतु पाऊस गायब झाल्याने राब करपण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत होती. राब करपले असते, तर शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले असते, परंतु जुलै महिना लागताच पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकºयांची चिंता दूर झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून पाऊस पडत असल्याने आता शेतीच्या कामांना वेग आला आहे. काही ठिकाणी भात लावणीच्या कामेही सुरू आहेत.
अलिबाग, पेण, रोहा, कर्जत, माणगाव, म्हसळा, खालापूर, पाली, पनवेल यासह अन्य तालुक्यांमध्ये भाताचे पीक घेतले जाते. त्यामुळे या ठिकाणी शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतीची कामे रखडली होती. शेतात टाकलेला राबही करपण्याची भीती निर्माण झाली होती. आता पावसाने सुरुवात केल्याने मनातील भीती दूर झाली आहे. पावसामुळे आता भात लावणीच्या कामांना वेग आला आहे, असे अलिबाग तालुक्यातील आत्माराम पाटील यांनी स्पष्ट केले.
समुद्रात चार मीटर उंचीच्या लाटा उसळणार
निसर्ग चक्रीवादळाने ३ जून रोजी जोरदार तडाखा दिल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातून जिल्हा सावरत आहे. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ३ जुलै ते ८ जुलै रोजी समुद्र खवळलेला राहणार आहे. या कालावधीत समुद्रामध्ये सुमारे चार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे समुद्रात कोणीच जाऊन नये, असा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाºयानंतर जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.