अलिबाग : रायगड जिल्ह्यातील महाड आणि माणगाव तालुक्याला पुन्हा अतिवृष्टीचा फटका बसला आहे. काळ व सावित्री नद्यांनी रौद्ररूप धारण केल्याने नागरी वस्त्यांसह बाजारपेठेत पाणी घुसले. महाडला चारही बाजूने पुराच्या पाण्याने वेढले आहे. पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने मदतीसाठी एनडीआरएफसह भारतीय लष्कर मंगळवारी महाडमध्ये दाखल झाले. त्यांनी ६० जणांना रेस्क्यु करून बाहेर काढले असून बचावकार्य अद्याप सुरू आहे.दिवसभर संततधार बरसणाऱ्या पावसाचा जोर सायंकाळी वाढल्याने महाड तालुक्यातील बहुतांश भागात पाणी शिरले होते. त्याचप्रमाणे काळनदीनेही हाहाकार उडवल्याने बिरवाडी-आसनपोई येथील नागरिकांची सुटका करण्यास एनडीआरएफ व भारतीय लष्कराला पाचारण करण्यात आले. कोस्टगार्ड, महसूल प्रशासन, पोलीस दल, सामाजिक संस्था, नागरिकांच्या मदतीने बचाव आणि मदतकार्य उशिरापर्यंत सुरू होते. मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंत २०० मि.मी. पावसाची नोंद महाड तालुक्यात झाली आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी सांगितले.वसई-विरार अजून जलमयवसई : चार दिवस सतत पडणाºया मुसळधार पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी वसई शहराच्या अनेक भागांतील पाण्याचा निचरा अद्याप झालेला नाही. आजही अनेक रस्ते, गावे, पाडे आणि परिसर पाण्याखाली गेले आहेत. इमारतींच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पावसाचे पाणी गेल्याने रोगराईचे संकट निर्माण झाले आहे. अनेक सोसायट्यांत अद्याप पाणी आहे. त्यातच मीटर बॉक्सच पाण्यात असल्याने शनिवार रात्रीपासून येथील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.कसारा घाटातील वाहतूक विस्कळीतच, नवीन घाटात वाहने १० तास पडली बंदकसारा : जुन्या कसारा घाटात दरड पडणे व रस्ता खचणे सुरू असतानाच नवीन घाटातही काही ठिकाणी तडे गेले आहेत. परिणामी मुंबईकडे येणारी व नाशिककडे जाणारी वाहतूक नवीन घाटातून सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर ताण आला आहे. अवजड वाहने, लहान गाड्या यांची गर्दी नवीन घाटात होत आहे. मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास नवीन कसारा घाटातील दोन ठिकाणी वळणावर तीन ते चार ट्रक, कंटेनर बंद पडल्याने १० तास वाहतूक विस्कळीत झाली.महामार्ग विस्कळीत झाल्याचे समजताच कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय भोये, महामार्ग घोटी टॅपचे अधिकारी सागर डगळे आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत घाटात दाखल झाले. परंतु घाटातील नागमोडी वळणावर अवजड वाहने बंद पडल्याने तसेच इगतपुरी, कसाºयाच्या दिशेकडे वाहनांच्या रांगा लागल्याने बंद गाड्या काढण्यासाठी क्रेन आणण्यातही अडचणी येत होत्या. त्यात लहान गाड्या अस्ताव्यस्त घुसल्याने पोलिसांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.अखेर बंद असलेल्या जुन्या घाटातील दरडी काही प्रमाणात बाजूला करु न लहान गाड्या जुन्या घाटातून सोडल्या. त्यानंतर पोलीस प्रशासनाने क्रेनसाठी रस्ता तयार करत कसेबसे ते नवीन घाटात आणले व वळणावर बंद पडलेली वाहने हटवली. तब्बल १० तासाच्या परिश्रमानंतर पोलीस प्रशासनास घाट सुरळीत करण्यात यश आले. एकीकडे पाऊस तर दुसरीकडे घाटातील विघ्न यामुळे प्रवासी घाटात अडकून पडल्याने त्यांचे मोठे हाल झाले.माळशेज घाटात वाहतूक गुरुवारी सुरळीत होणार?ठाणे / टोकावडे : कल्याण - अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाट घाटात सुरू असलेला पाऊस, त्यातून उद्भवलेले दाट धुके यामुळे महामार्गावर पडलेल्या दरडी व झाडे हटवण्याच्या कामात मोठा अडथळा निर्माण होत आहे. कामे पूर्ण झाल्यानंतरही घाट रस्त्याची प्रत्यक्ष पाहाणी करूनच वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. यासाठी गुरुवार उजाडण्याची शक्यता तहसीलदार अमोल कदम यांनी व्यक्त केली. कल्याण जवळील उल्हासनदीवरील रायता पुलास लागून असलेला पुरात वाहून गेलेला रस्ता आता दुरुस्त केलेला आहे. तरी घाट बंद असल्यामुळे या महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे. या महामार्गावरील सावर्णे गांवाच्या परिसरात गेल्या दोन दिवसांपूर्वी दरड कोसळली, याशिवाय झाडेही उन्मळून पडले. याच ठिकाणी पुन्हा माती ढासळून पडत आहे.
अतिवृष्टीमुळे महाड, माणगावची स्थिती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 5:17 AM