मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:31 AM2020-09-24T00:31:23+5:302020-09-24T00:31:42+5:30
रायगड जिल्ह्यात पनवेलमध्ये सर्वाधिक पाऊस : मुरुड तालुक्यातील आगरदांडा बंदरात स्थिरावल्या २०० हून अधिक बोटी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरुड : हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणेच मुरुड तालुक्यात सतत दोन दिवस पावसाची रिमझिम सुरू असल्याने जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. सतत पाऊस बरसत असल्याने नदी-नाले व विहिरी तुडुंब भरून वाहत आहेत. त्याचप्रमाणे, शेतामध्ये पाणीच पाणी जमा झाले आहे, तर आगरदांडा बंदरावर २००वर बोटी स्थिरावल्या आहेत. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा जोर पकडल्याने सर्वत्र गारवा निमाण झाला आहे.
मुरुड तालुक्यात पावसाने तीन हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला असून, आतापर्यंत ३,०८५ मिलीमीटर एवढा पाऊस बरसला आहे. पावसामुळे याचा परिणाम एसटी वाहतुकीवर दिसून आला. पावसामुळे कोणीही प्रवासी प्रवास करणे टाळत आहे. त्याचप्रमाणे, आगरदांडा बंदरात मुरुड तालुक्यसह श्रीवर्धन रत्नागिरी, गुजरात, कर्नाटक आदी भागांतीलही बोटी आढळून येत आहेत. सुमारे २०० हून अधिक बोटींनी येथे आसरा घेतला आहे. खोल समुद्रात जोरदार वारे व तुफान आल्याने आम्ही किनारा गाठला असल्याची माहिती येथील बोट मालकांनी ‘लोकमत’ला दिली.
प्रशासनाकडून थांबलेल्या बोटींची काळजी घेण्यात येत असून, त्यांना आवश्यक असणारा पाणीपुरवठा, त्याचप्रमाणे डिझेल व रेशनिंग सामान पुरविण्याबाबत लक्ष दिले जात आहे. रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी सांगितले की, वातावरणात बदल झाल्याने खोल समुद्रात उंच लाटा व वेगाने वाहणारे वारे, यामुळे मासळी पकडण्यास मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे मासेमारी करणे कठीण बनले होते. धोका वाटत असल्याने सर्व बोटी आगरदांडा व दिघी बंदर सुरक्षित असल्याने, मुंबई, गुजरात, कर्नाटक आयडी भागातील बोटी या ठिकाणी थांबल्या असल्याचे बैले यांनी सांगितले.
खोल समुद्रात पाऊस व जोरदार वारे झाल्यामुळे बाहेरील बोटींनी सुरक्षित अशा आगरदांडा बंदरात आसरा घेतला आहे. सुमारे दोनशे बोटी किनाºयला स्थिरावल्या आहेत. गुजरात महाराष्ट्र व दमण आदी भागांतील होड्या येथे थांबल्या आहेत. प्रशासनाकडून त्यांची काळजी घेतली जात आहे.
-तुषार वाळुंज ,
मत्स्य विकास अधिकारी