अलिबागमध्ये मुसळधार पावसाने हाहा:कार; तालुक्यात अनेक भागात पूरस्थिती; नागरिकांच्या घरात शिरले पाणी
By राजेश भोस्तेकर | Published: July 8, 2024 09:28 AM2024-07-08T09:28:18+5:302024-07-08T09:28:57+5:30
रामराजमध्ये सर्वाधिक २८० मिमी पडला पाऊस, पूरस्थितीमुळे अलिबाग-रोहा मार्ग वाहतुकीस बंद.
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : रायगड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. या पावसाचा अलिबाग तालुक्याला मोठा फटका बसला असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या घरात पाणी घुसून नागरिकांच्या सामानाचे नुकसान झाले आहे. अलिबाग रोहा रस्ता रस्त्यावर पाणी साचल्याने पावसामुळे वाहतुकीस बंद झाला आहे. तालुक्यातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन सह अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील हे परिस्थितीवर लक्ष देऊन आहेत. सुदैवाने या परिस्थितीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. रामराज मंडळात सर्वाधिक २८० मिमी पाऊस पडला आहे.
अलिबाग तालुक्यात मध्यरात्री १२ वाजल्यापासून मुसळधार पावसाने सुरुवात केली होती. त्यातच समुद्राला भरती असल्याने वरून पडणारा मुसळधार पाऊस आणि भरती यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. अलिबाग तालुक्यातील नेहूली, रामराज, चौल, नागाव या भागात नदी, खाडीला पाणी वाढल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. रामराज बोरघर हा रस्ता पाण्याखाली गेला असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. अलिबाग रोहा मार्गावर ही पाणी साचल्याने हा मार्गही वाहतुकीस बंद झाला आहे.
नागाव बायपास हा रस्ता ही पाण्याने भरल्याने बंद आहे. अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील हे तालुक्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तर जिल्हाधिकारी किशन जावळे हे सुध्दा पावसाळी परिस्थितीबाबत माहिती घेऊन अधिकाऱ्यांना सूचना करीत आहेत. पाणी येऊन नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांचे पंचनामे केले जात आहेत. पावसाचा जोर अजूनही ओसरला नसल्याने सोमवारीही पूरस्थिती वाढण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. नदी, खाडी किनारी भागतील नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अलिबागमध्ये मंडळ निहाय पडलेला पाऊस
सारळ २२१ मिमी, चरी २३६ मिमी, रामराज २८० मिमी, किहीम २१४ मिमी, पोयनाड १८४ मिमी, चौल १९२ मिमी एवढा पडला आहे.