Raigad Fort ( Marathi News ) : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मागील काही तासांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. राजधानी मुंबईसह कोकणातील अनेक भागांमध्ये पावसाने झोडपून काढलं आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. या पार्श्वभूमीवीर आजपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.
रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. तसेच सद्यस्थितीत किल्ले रायगडावर असलेल्या पर्यटकांना रोपवेने गडावरून खाली नेण्यात येत आहे. प्रशासनाकडून किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे बंद करण्यात आला आहे.
हवामान खात्याचा इशारा
हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार पुढचे पाच दिवस दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, अंतर्गत कर्नाटक, मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने रविवारी दिली. तसेच मध्य महाराष्ट्रात ९ ते ११ जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. ८ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अतिवृष्टीचा अंदाज विभागाने वर्तवला आहे.
कोकणात पावसाचं थैमान
रायगड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. या पावसाचा अलिबाग तालुक्यालाही मोठा फटका बसला असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या घरात पाणी घुसून नागरिकांच्या सामानाचे नुकसान झाले आहे. अलिबाग रोहा रस्ता रस्त्यावर पाणी साचल्याने पावसामुळे वाहतुकीस बंद झाला आहे. तालुक्यातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे.
दुसरीकडे, रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी दिवसभर कोसळलेला पाऊस रात्रीही मुसळधार सुरू होता. सोमवारची सकाळ ही मुसळधार पावसानेच झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी आणि राजापूर तालुक्यातील कोदवली नदीच्या पाण्याने इशारा पातळी ओलांडली आहे. पावसात सातत्य राहिले तर नद्या धोक्याची पातळी ओलांडतील आणि पूर येईल असे चित्र दिसत आहे.