महाड तालुक्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची दमदार हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 07:32 PM2021-05-04T19:32:05+5:302021-05-04T19:32:48+5:30
Rain in Mahad : महाड तालुक्यामध्ये मंगळवार 4मे 2021रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणार्या कामगारांची एकच तारांबळ उडाली.
महाड - महाड तालुक्यामध्ये मंगळवार 4मे 2021रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणार्या कामगारांची एकच तारांबळ उडाली.
पावसाची जोरदार सर पडल्याने महामार्गावरील अनेक ठिकाणी पाणीच पाणी साठले होते .वाऱ्यासह विजांचा कडकडाट व जोरदार पावसाच्या सरी यामुळे अनेक कामगारांना पत्र्याच्या शेडचा आधार घ्यावा लागत होता .मान्सूनपूर्व पावसामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये उष्णतेपासून नागरिकांची सुटका होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी विद्युत पुरवठा मात्र खंडित झालेला आहे .पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरून पोलादपूर ते म्हाडाचा प्रवास करणार्या दुचाकीस्वारांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे .पाऊस पडण्यापूर्वी धुळीचे साम्राज्य तर पाऊस पडल्यानंतर चिखलाचे साम्राज्य अशा दुहेरी संकटाचा सामना प्रवास करताना दुचाकीस्वारांना करावा लागत आहे .
पंधरा ते वीस मिनिटांत पावसाच्या सरी कोसळून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते .चारचाकी वाहनांच्या टायरमधून उडणार्या पाण्याचा सामना करील दुचाकीस्वारांना आपल्या इच्छित स्थळी पोहचावे लागत आहे.