टोळ, दादली पुलावरून अवजड वाहतूक सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 01:39 AM2019-11-04T01:39:06+5:302019-11-04T01:39:33+5:30

स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

Heavy traffic from the locust, Dadali bridge continues in raigad | टोळ, दादली पुलावरून अवजड वाहतूक सुरूच

टोळ, दादली पुलावरून अवजड वाहतूक सुरूच

Next

सिकंदर अनवारे 

दासगाव : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांस जोडणारे दादली, टोळ आणि आंबेत हे तीन पूल कमकुवत झाल्याने या पुलांची दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. या पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आजही पुलांवरील अवजड वाहतूक सुरूच आहे.

महाड जवळील दादली गावाजवळ, आंबेत गावानजीक आणि खाडीपट्टा विभागातील टोळ गावाजवळील पूल हे सावित्री नदीवर बांधण्यात आले आहेत. १९८० च्या सुमारास बांधण्यात आले असून तिन्ही पुलांवरून पूर्वीपेक्षा वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
अवजड वाहतूक आणि वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे पुलांचे नुकसान झाले आहे, शिवाय सावित्री नदीतील पूल वाहून गेल्याच्या घटनेनंतर या मोठ्या पुलांचीही तपासणी करण्यात आली. पाण्याखालील यंत्रणा वापरून पुलांची तपासणी केली असता पुलांच्या पायथ्याशी दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचे निरीक्षण करणाºया एजन्सीने सार्वजनिक बांधकाम विभागाला सुचवले. त्यानंतर आंबेत पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. यामुळे पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसा सूचना फलकही पुलालगत लावण्यात आला आहे. या मार्गावरील एसटी बसेसही महाड मार्गे वळवण्यात आल्या आहेत. मात्र, आंबेत पुलावरील वाहतूक बंद केली असली तरी टोळ आणि दादली पुलावरील अवजड वाहतूक सुरूच आहे. दादली, टोळ आणि आंबेत हे तिन्ही पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतात. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ फलक लावून आपली जबाबदारी झटकली आहे तीन पुलांपैकी दादली आणि टोळ पुलावरून अवजड वाहतूक सुरूच आहे.
दादली आणि टोळ या दोन्ही पुलावरून वाळू, माती आणि खडी वाहतूक करणारे मोठे ट्रक सतत ये-जा करतात. दोन्ही पुलांजवळ पोलीस तपासणी नाके आहेत. मात्र, पुलाजवळ सूचना फलक लावूनही पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोरूनच ही अवजड वाहने ये-जा करत आहेत. अवजड वाहने जाणार नाहीत याकरिता त्या उंचीचे बॅरिकेड लावणे आवश्यक आहे. मात्र, हे बॅरिकेड लावण्यावरून सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन आणि महसूल विभागामध्ये तू तू मै मै सुरू आहे. हे पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याने त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे सांगितले जात आहे. तर वाहतुकीचा प्रश्न असल्याने पोलिसांनी कारवाई करावी, अशी भूमिकाही घेतली जात आहे. आंबेत पुलाचे काम सुरू होण्यापूर्वी या पुलावरूनही अवजड वाहतूक सुरूच होती. पुलाचे काम सुरू झाल्याने जिल्हाधिकाºयांनी या पुलावरील वाहतूक थांबवण्याचे आदेश दिले. मात्र, जर तिन्ही पूल कमकुवत आहेत तर दादली आणि टोळ पुलावरील अवजड वाहतूकही थांबवावी, अशी मागणी केली जात आहे.

माती उत्खननही सुरूच
च्टोळ आणि दादली पुलावरून मोठ्या प्रमाणात वाळू आणि माती वाहून नेणारे ट्रक ये-जा करत असतात. टोळ जवळही सध्या माती उत्खनन सुरू असून या याकरिता स्थानिक प्रशासन या पुलावरून अवजड वाहतूक बंद करत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत. अवजड वाहतुकीला स्थानिक प्रशासन पाठबळ देत असल्याचे समोर आले आहे.

टोळ पुलावर सार्वजनिक बांधकाम विभागाने सूचना फलक लावला आहे. मात्र, वाहतुकीशी संबंधित विषय असल्याने वाहतूक पोलिसांनी याबाबत कारवाई करणे गरजेचे आहे.
- एस. व्ही. पठाडे, उपभियंता,
बांधकाम विभाग, महाड

पुलांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे, यामुळे बॅरिकेड लावून अवजड वाहतुकीला आळा घालता येणे शक्य आहे.
- चंद्रसेन पवार, तहसीलदार, महाड
आंबेत पुलाची दुरुस्ती सुरू असल्याने जवळपास दोन महिने तरी अवजड वाहतूक बंद राहणार आहे.
- शिवलिंग उल्लागडे,
शाखा अभियंता, माणगाव
 

Web Title: Heavy traffic from the locust, Dadali bridge continues in raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.