दिघी पोर्टची अवजड वाहतूक म्हसळावासीयांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:06 AM2019-09-18T00:06:44+5:302019-09-18T00:06:47+5:30

गेल्या १० ते १२ वर्षांपासून दिघी पोर्टची अवजड वाहतूक म्हसळा शहरातून धोकादायकरीत्या सुरू आहे.

Heavy transport of Dighi Port to the lives of the Mhasals | दिघी पोर्टची अवजड वाहतूक म्हसळावासीयांच्या जीवावर

दिघी पोर्टची अवजड वाहतूक म्हसळावासीयांच्या जीवावर

googlenewsNext

- अरुण जंगम 
म्हसळा : गेल्या १० ते १२ वर्षांपासून दिघी पोर्टची अवजड वाहतूक म्हसळा शहरातून धोकादायकरीत्या सुरू आहे. याचाच प्रत्यय मंगळवार, १७ सप्टेंबरला म्हसळा शहरवासीयांना आला. पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास एक लोखंडी कॉइल वाहतूक करणारा ट्रेलर (एम. एच. ४६ बी. एफ. ५३१९ ) वेगात नवानगर येथील एका इमारतीच्या दुकानात घुसला. अपघाताची वेळ ही पहाटेची असल्याने दुकाने बंद होती, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
दिघी पोर्ट येथून पोस्को महाराष्ट्र स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, विळे-भागाड, माणगाव येथे गेले अनेक वर्षे नियमित लोखंडी कॉइल घेऊन जाणाऱ्या जवळपास २०० ते २५० ट्रेलरची वाहतूक रोज सुरू आहे. त्यातीलच एक ट्रेलर मंगळवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने वेगाने नवानगर येथील मुख्य रस्त्याला लागून असलेल्या आतिक खतीब यांच्या इमारतीतील शिवसेना तालुकाप्रमुख महादेव पाटील व सिराज मुसा यांच्या गाळ्यासमोरील गटार व पत्रा शेड तोडून धडकल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने अपघाताची वेळ ही पहाटेची असल्याने दुकानमालकांसहित कोणतीही व्यक्ती अपघातसमयी हजर नव्हती. अपघात घडताच ट्रेलरचालकाने मात्र त्वरित घटना स्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच म्हसळा नवानगर येथील नागरिकांनी घटनास्थळी जमा होऊन या अवजड वाहतुकीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. त्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा दिघी रस्ता ते श्रीवर्धन रस्त्यापर्यंत लागल्या होत्या. त्यामुळे पहाटे म्हसळा शहरात प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. काही वेळातच पोलीसही घटनास्थळी हजर झाले व शेवटी म्हसळा पोलीसठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढून वाहतूक सुरळीत केली. या अपघातासंदर्भात संबंधित ट्रेलरचालकावर म्हसळा पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. याआधी म्हसळा तालुक्यातील खरसई गावाच्या हद्दीतील एका घरात असाच लोखंडी कॉइल घेऊन जाणारा ट्रेलर घुसून घराचे नुकसान झाले होते, त्या वेळीही सुदैवाने घरातील व्यक्ती बचावल्या.
>पहाटे ४.४५ च्या सुमारास मला एखादा स्फोट व्हावा, असा प्रचंड मोठा आवाज ऐकू आला. मी राहत असलेल्या घराच्या बाजूच्या इमारतीला लोखंडी कॉइल घेऊन जाणाºया ट्रेलरने धडक दिली असल्याच निदर्शनास आले. हा आवाज इतका मोठा होता की नवानगर येथील अनेक नागरिक त्वरित घटनास्थळी काय घडले हे पाहण्यासाठी जमा झाले. या घटनेमुळे माझे कुटुंब तसेच परिसरातील नागरिक प्रचंड भयभीत झाले आहेत. ट्रेलर जर थोडा पुढे आला असता तर थेट माझ्या घरातच घुसला असता आणि मोठा अनर्थ झाला असता.
- नवीद जंजीरकर, नवानगर, प्रत्यक्षदर्शी
म्हसळा शहरातून ही अवजड वाहतूक बंद व्हावी, यासाठी आम्ही प्रशासनाला अनेक वेळा विनंती केली आहे. याआधी दिघी पोर्टमधून २५-२८ टन वजनाची लोखंडी कॉइल तसेच कोळसा येत असे; परंतु गेल्या काही महिन्यांत इथॅॅनॉल सारख्या प्रचंड ज्वलनशील द्रवपदार्थाचीही वाहतूक होत आहे. म्हसळा नगरपंचायतीकडे अद्याप अग्निशमक यंत्रणा उपलब्ध नाही, तसेच दिघी पोर्टनेही शहराजवळ कोणत्याही प्रकारची अग्निशमक यंत्रणेची व्यवस्था केलेली नाही मग या ज्वलनशील पदार्थाची वाहतूक दिघी पोर्ट कोणत्या नियमाने करीत आहे ते दिघी पोर्ट प्रशासनाने सांगावे. ही दिघी पोर्टची अवजड वाहतूक म्हसळा शहरातून त्वरित बंद करावी अन्यथा आम्ही शहरवासीय स्वत: दिघी पोर्टचा एकही ट्रेलर किंवा टँकर म्हसळा शहरातून जाऊ देणार नाही.
- मुसद्दिक इनामदार, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Heavy transport of Dighi Port to the lives of the Mhasals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.