- निखिल म्हात्रे अलिबाग : बाप्पाचे आगमन आता काही दिवसांवर येऊ ठेपले आहे. येत्या २२ आॅगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई येथून हजारो गणेशभक्त त्यांच्या वाहनांनी मोठ्या प्रमाणावर कोकणात आपल्या गावी दाखल होणार आहेत. त्यांचा प्रवास सुखकर आणि सुरिक्षत व्हावा, याकरिता मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश १४ आॅगस्ट रोजी जारी के ले.कोकणात गणेशोत्सवासाठी हजारोंच्या संख्येने चाकरमानी दाखल होतात. त्यामुळे या कालावधीत महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढते. मुंबई-गोवा-राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, याकरिता महाराष्ट्र शासनाकडून केलेल्या आदेशाप्रमाणे रायगड पोलिसांकडून अवजड वाहन बंदी आदेश जारी केले आहेत.या आदेशानुसार, १८ आॅगस्ट रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते २२ आॅगस्ट रोजी सायंकाळी ८ वाजेपर्यंत १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या वाहतुकीस पूर्ण वेळ बंदी राहणार आहे. तर गौरी-गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी २८ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते २९ आॅगस्ट रोजी सकाळी वाजेपर्यंत १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या वाहतूक पूर्णवेळ बंद राहील. १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजल्यापासून ते २ सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनाची वाहतूक दिवसा बंद राहील, तर रात्री सुरू राहणार आहे. १८ आॅगस्ट रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते २ सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत वाळू, रेती व तत्सम गौणखनिज वाहतुकीस पूर्ण वेळ बंदी करण्यात आली आहे.
महामार्गावर अवजड वाहनांना बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 12:16 AM