राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग : रायगड जिल्ह्यात ५ जानेवारी २०२३ रोजी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम लोणेरे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातून ७५ हजार नागरिक उपस्थित राहणार असल्याने मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ५ जानेवारी रोजी १२ वाजलेपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सोडता अवजड वाहनांना मुंबई गोवा महामार्गावर बंदी करण्यात आलेली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांच्या सहीने आदेश काढण्यात आले आहेत.
शासन आपल्या दारी हा कार्यक्रम शासनामार्फत प्रत्येक जिल्ह्यात आयोजित केला जात आहे. रायगड जिल्ह्यातही हा कार्यक्रम ५ जानेवारी रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी सुरु आहे. या कार्यक्रमात लाभार्थी याना दाखले वाटप केले जाणार आहे. कार्यक्रमात महत्वाचे जनजागृतीपर प्रदर्शन ठेवले आहे. कार्यक्रमास ७५ हजार नागरिक उपस्थित असल्याने ने आण करण्यास वाहनाची सुविधा प्रशासन तर्फे करण्यात आली आहे. या कार्यक्रमास २ हजार बसेस आणि इतर वाहने येणार असल्याने मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहने याची वाहतूक सुरू राहिल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने ५ जानेवारी रोजी १२ ते रात्री ११ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी केली आहे. मुंबई गोवा महामार्गावर तसेच पाली वाकण मार्गाने कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या अवजड वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे. ५ जानेवारी रोजी सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत आणि दुपारी ३ ते १० या कालावधीत गोवा मार्गे येणारी वाहने मोरबे मार्गे अशी वळविण्यात येणार आहेत. असे आदेश जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी दिले आहेत.