लोकमत न्यूज नेटवर्क , अलिबाग : किल्ले रायगडावर शनिवार, १२ एप्रिल रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम होणार आहे. यासाठी हजारो शिवभक्त किल्ले रायगडावर येणार आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गावर उद्या जड, अवजड वाहनांना बंदी केली आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवपुण्यतिथी कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदी मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.
या वाहनांना वगळले... वाहतूक बंदी अधिसूचना ही दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलिस वाहने, फायर ब्रिगेड वाहने, रुग्णवाहिका, तसेच महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमासाठी येणारी वाहने यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.