पनवेल - मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना दि.27 ऑगस्ट पासुन वाहतुकीस बंदी असताना देखील या मार्गावर अवजड वाहनांचा मार्गक्रमण सुरूच असल्याने नवी मुंबई वाहतुक पोलिसांनी काढलेल्या अवजड वाहनांच्या बंदीचा निर्णय कागदावरच असल्याचे बोलले जात आहे.
गणेशोत्सव पूर्ण होईपर्यंत 16 टन क्षमतेचे किंवा त्यापेक्षा अधिक वाहनांना यामध्ये ट्रक,ट्रेलर तसेच मल्टी एक्सल वाहनांना या मार्गावर वाहतुकीस पूर्णपणे बंदी आहे.या बंदीच्या अनुषंगाने अवजड वाहनांना पर्यायी वाहतूक म्हणुन कोन फाटा,कोन गाव एक्स्प्रेस ब्रीज,मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग खालापूर फाटा,वाकण फाटा वरून मुंबई गोवा महामार्गाकडे प्रस्थान करण्याची सूचना या अवजड वाहन चालकांना केली असताना देखील सर्रास पळस्पे फाटा येथून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात येजा सुरु आहे.पळस्पे फाटा याठिकाणी वाहतूक पोलिसांमार्फत सर्वसामान्य वाहन चालकांवर वाहतूक पोलीस कारवाई करीत आहेत.मात्र अवजड वाहनांवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एकीकडे रस्त्याची दुरावस्था त्यातच अवजड वाहनांची रस्त्यावर गर्दी यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. प्रतिक्रिया - बंदी झुगारणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलीस कारवाई करीत आहेत.या व्यतिरिक्त या पनवेल नजीक मुंबई गोवा महार्गावर पाच महत्वाचे गोदामात अवजड वाहने येजा करत असतात.या पाच यार्डातील काही गोदामांमध्ये शीतगृहे देखील आहेत.या गोदामांना याठिकाणी वाहतुकीस सूट देण्यात आली आहे.इतर कोणतीही वाहने मार्गावर धावत नाहीत. - तिरुपती काकडे (पोलीस उपायुक्त,नवी मुंबई वाहतुक )