नवसूच्या वाडीतील भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:42 PM2019-06-05T23:42:39+5:302019-06-05T23:42:53+5:30

विहिरी आटल्या : दोन डोंगर उतरून न्यावे लागते पाणी; महिलांना करावी लागते पायपीट

Heavy water shortage in Navsu's Wadi | नवसूच्या वाडीतील भीषण पाणीटंचाई

नवसूच्या वाडीतील भीषण पाणीटंचाई

Next

कांता हाबळे

नेरळ : कर्जत तालुक्यातील वारेमध्ये असलेल्या नवसूची वाडीमध्ये भीषण पाणीटंचाईला आदिवासी ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. त्या वाडीतील आदिवासी लोकांना नळपाणी योजना नसल्याने आणि वाडीमधील सर्व विहिरी आटल्याने पाणी आणण्यासाठी दोन डोंगर उतरून खाली कुरुंग येथील विहिरीवर जावे लागत आहे. दरम्यान, तब्बल चार किलोमीटरची पायपीट नवसूच्या वाडीमधील महिलांना करावी लागत आहे. शासनाचे टँकर पाणी अशी पाणीटंचाई असूनदेखील पोहोचत नाहीत.

वारे ग्रामपंचायतमधील नवसूची वाडी ही आदिवासीवाडी वारे-ताडवाडी रस्त्यावर असून, मुख्य रस्त्यावरून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या आदिवासीवाडीमधील पिण्याच्या पाण्याची विहीर आटली आहे. ४५ घरांची वस्ती असलेल्या नवसूची वाडीमधील पिण्याचे पाणी एप्रिल महिन्यात आटले आहे.

एप्रिल महिन्यापासून नवसूच्या वाडीतील महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी वाडीमध्ये मुख्य रस्त्याने यावे लागते, येथे येण्यासाठी लागणारे दोन्ही डोंगर उतरून खाली मुख्य रस्त्यावर असलेल्या कुरुंग येथील विहिरीवर जावे लागते. ते अंतर साधारण साडेतीन ते चार किलोमीटरचे असून, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पायी जाण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय आदिवासी ग्रामस्थांकडे नाही. त्यामुळे साडेतीन-चार किलोमीटरचे अंतर पार करून खाली बोअरवेलवर पाणी भरण्यासाठी आलेल्या महिला पुन्हा त्याच रस्त्याने डोंगर चढून वाडीत पोहोचतात. ही कसरत नवसूची वाडीमधील आदिवासी लोकांना दररोज करावी लागत आहे. त्या महिलांना एकदा डोंगर उतरून खाली कुरुंग येथे गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा जाण्याशिवाय पर्याय उरला नाही, अशी अवघड वाट नवसूच्या वाडीची असून खाली डांबरी रस्ता आग ओकत असताना पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ शासनाच्या लक्षात येत नाही.

आदिवासीवाडीमधील ग्रामस्थांनी वारे ग्रामपंचायत आणि शासनाकडे कुरुंगच्या शासकीय बोअरवेलमधून पाणी योजना करण्याची मागणी केली आहे. त्या बोअरवेलमधून नळपाणी योजना करता येत नसेल तर वाडीच्या अर्ध्या खाली आल्यानंतर असणाºया नाल्यात विहीर खोदून द्यावी आणि त्या विहिरीमधील पाणी पंप लावून वाडीमध्ये नेऊन नव्याने बांधण्यात आलेल्या साठवण टाकीमध्ये टाकावे, अशी मागणी होत आहेत.

नवसूच्या वाडीमध्ये नवीन विहीर बांधण्याचा प्रस्ताव तयार असून तो मंजूर झाल्यास नवीन नळपाणी योजना तयार करता येईल. ग्रामस्थांची सूचना आहे त्याच ठिकाणी विहीर खोदली जाईल, असे आश्वासन आम्ही ग्रामस्थांना दिले आहे. - आर. डी. कांबळे, उपअभियंता, जिल्हा लघु-पाटबंधारे विभाग

नवसूची वाडी पाणीटंचाई कृती आराखड्यात संभाव्य पाणीटंचाईग्रस्त वाडी म्हणून नाव आहे. मात्र, तेथे शासनाचे टँकर पोहोचविण्याचा प्रस्ताव आला नाही. - बाळाजी पुरी, गटविकास अधिकारी, कर्जत पंचायत समिती

Web Title: Heavy water shortage in Navsu's Wadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.